मनसेने केली उल्हासनगर मध्यवर्ती सरकारी रुग्णालयातील अपुऱ्या सोयीसुविधांची पोलखोल

दिनेश गोगी
शुक्रवार, 13 जुलै 2018

रुग्णालयात औषधे उपलब्ध नसणे, सिटीस्कॅन, एक्सरे मशीन वारंवार नादुरुस्त असल्याची कारणे रुग्णालय प्रशासनाकडून सांगणे, अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरवर बंद असल्याने अद्यावत सुविधा रुग्णांना मिळत नाहीत.

उल्हासनगर - उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात औषधांचा तुटवडा, यंत्रसामग्रीचा अभाव, अपुरा स्टाफ, डॉक्टर आणि स्टाफचे रुग्णांशी उद्धटपणे वर्तन अशा अनेक समस्या भेडसावत असल्याचा आरोप मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे. लवकरात लवकर या समस्या सोडविण्यात आल्या नाहीत तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी रोज शेकडो रुग्ण येत असतात. या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फार गंभीर समस्यांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी मनसेच्या कार्यकर्त्यांना प्राप्त झाल्यानंतर काल मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख, विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष मनोज शेलार, उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, अनिल जाधव तसेच मैनऊद्दिन शेख, सुभाष हटकर, मुकेश सेतपलानी, प्रमोद पालकर, प्रविण माळवे, मुकेश चव्हाण, अक्षय धोञे, बादशहा शेख, अरुण कोळी, सचिन चौधरी यांनी काल प्रत्यक्षात मध्यवर्ती रुग्णालयात धडक देऊन प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी येथे येणाऱ्या रुग्णांबरोबर उद्धटपणे वर्तन करतात. रुग्णालयात औषधे उपलब्ध नसणे, सिटीस्कॅन, एक्सरे मशीन वारंवार नादुरुस्त असल्याची कारणे रुग्णालय प्रशासनाकडून सांगणे, अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरवर बंद असल्याने अद्यावत सुविधा रुग्णांना मिळत नाहीत. रुग्णालयाची जुन्या इमारतीला पावसामुळे गळती लागली असून ती दुरुस्त करण्यासाठी सुध्दा निधी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाच्या आजूबाजूच्या परिसराची व रस्त्याची सुध्दा मोठ्या प्रमाणात दुरअवस्था झाली  असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णालय प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत असे दिसून आले. या प्रकरणी मध्यवर्ती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ सुधाकर शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ जाफर तडवी, डॉ निंभोरे व अन्य वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी मनसे पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर या समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली आहे . या मध्ये दिरंगाई केल्यास मनसे उग्र आंदोलन करणार असा इशाराही मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MNS has exposed the inadequate facilities of Ulhasnagar Central Government Hospital