अॅमेझॉन, फ्लिपकार्टनंतर मनसेचा डिस्ने हॉटस्टारला इशारा

पूजा विचारे
Wednesday, 21 October 2020

ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला दणका दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला मोर्चा डिस्ने हॉटस्टारकडे वळवला आहे. मनसेनं आता हॉटस्टारला आयपीएल सामन्याचं समालोचन मराठीत करण्यासाठी पत्र पाठवलं आहे. 

मुंबईः ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला दणका दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला मोर्चा डिस्ने हॉटस्टारकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेनं अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट आपल्या अॅपमध्ये मराठीचा समावेश करण्यासाठी इशारा दिला होता. त्यानंतर मनसेनं आता हॉटस्टारला आयपीएल सामन्याचं समालोचन मराठीत करण्यासाठी पत्र पाठवलं आहे. 

सध्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) सुरु आहे. यादरम्यान सामन्यांचे समालोचन मराठीत करावे यासाठी मनसेनं डिस्ने हॉटस्टारकडे कंपनीला पत्र पाठवलं आहे.  मनसेच्या कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी ट्विटरवरुन या संदर्भातली माहिती दिली आहे.

आयपीएल संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या, नाहीतर खळ्ळखट्याक पद्धतीने आंदोलन करु. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल, असा इशारा मनेसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्राद्वारे दिला आहे.  त्यांनी ट्विटरवर पत्राचा फोटोदेखील शेअर केला आहे. 

आयपीएल क्रिकेट सामान्यांचं समालोचन मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करु, पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असुद्या, असा इशारा देखील मनसेच्या केतन नाईक यांनी दिला आहे.

अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांची हजेरी असलेल्या कार्यक्रमाला राज्यपालांची गैरहजेरी

सध्या आयपीएलचे समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली भाषेमध्ये उपलब्ध असून अ‍ॅपमध्ये मराठीचा पर्याय देण्यात आलेला नाही असं मनसेनं म्हटलं आहे. म्हणूनच हॉटस्टार डिस्नेच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर इतर प्रादेशिक भाषांप्रमाणे मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी मनसेनं केली आणि त्यासाठी कंपनीला पत्रव्यवहार केला आहे.

अधिक वाचाः  सुशांतसिंह राजपूत प्रकरण: दीपेश सावंतकडून NCBवर १० लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मुंबईत आपल्या कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. त्याचप्रमाणे आयपीएलचा मोठा प्रेक्षक वर्ग हा मराठी आहे असं असतानाही तुम्हाला मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे, असं म्हणत मनसेने हॉटस्टारला खडेबोल देखील सुनावलेत.

MNS hints at Disney hotstar after Amazon Flipkart


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS hints at Disney hotstar after Amazon Flipkart