महापौरपदाच्या तिरंगी लढतीत मनसेची भूमिका निर्णायक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई - मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उद्या (ता. 4) आहे. युतीबाबत प्रश्‍नचिन्ह असतानाच भाजपने महापौर आणि उपमहापौरपदाचे अर्ज घेतले आहेत. शिवसेना आणि कॉंग्रेसनेही महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याची तयारी केली आहे; परंतु भाजपनेही अर्ज भरल्यास मनसेची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

मुंबई - मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उद्या (ता. 4) आहे. युतीबाबत प्रश्‍नचिन्ह असतानाच भाजपने महापौर आणि उपमहापौरपदाचे अर्ज घेतले आहेत. शिवसेना आणि कॉंग्रेसनेही महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरण्याची तयारी केली आहे; परंतु भाजपनेही अर्ज भरल्यास मनसेची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

मुंबईच्या महापौरपदासाठी 8 मार्चला निवडणूक होत आहे. शिवसेनेने 84 नगरसेवकांसह चार अपक्षांचा पाठिंबा मिळवत 88 सदस्यांची कुमक जमा केली आहे, तर एका अपक्ष नगरसेविकेने भाजपला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. संख्याबळ जुळवण्याच्या स्पर्धेत भाजप मागे पडत असताना आज अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनी त्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला. यामुळे भाजपची कुमक 84 वर पोचली आहे.

शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेस अशा तिन्ही पक्षांनी अर्ज भरल्यास महापौरपदासाठी पहिल्यांदाच तिरंगी लढत होईल. शिवसेनेकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याने त्या पक्षाचा महापौर सहज निवडून येऊ शकतो; मात्र मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यास शिवसेनेचे समीकरण बिघडू शकते. आम्हाला गृहीत धरू नका, अशी भूमिका आज मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी मांडली. यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. मनसेने मतदानात भाग न घेतल्यास शिवसेनेचा फायदा होईल; मात्र मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यास शिवसेनेची अडचण होऊ शकते.

नावे गुलदस्त्यात
महापौर आणि उपमहापौरपदाच्या आपल्या उमेदवारांची नावे शिवसेना आणि भाजपने गुलदस्त्यात ठेवली आहेत. कॉंग्रेसने मात्र ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना महापौरपदाच्या निवडणुकीत उतरवले आहे.

माघार कोण घेणार?
महापौरपदाचा अर्ज भरल्यानंतरही शिवसेना भाजपची युती होऊ शकते; मात्र युतीची चर्चा महापौरपदाबाबतच होऊ शकते. त्यामुळे युती झाल्यास महापौरपद कोणाला मिळाणार हा सर्वांत मोठा प्रश्‍न आहे. निवडणुकीच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील; पण अर्ज कोण मागे घेणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

संख्याबळ
- शिवसेना अपक्षांसह- 88
- भाजप, अभासे आणि एक अपक्षासह- 84
- कॉंग्रेस- 31
- राष्ट्रवादी कॉंग्रेस- 9
- मनसे- 7
- सप- 6
- एमआयएम- 2

Web Title: mns important decission in mayor election