
Sandeep Deshpande : देशपांडे हल्ला प्रकरणात पोलिसांकडून आली महत्त्वाची अपडेट; आरोपींबद्दल दिली माहिती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल सकाळी अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ला प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या हल्ल्याबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे.
काल सकाळी शिवाजी पार्क इथं संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात आरोपींनी हल्ला केला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी भांडूपमधून ५६ वर्षीय इसमाला ताब्यात घेतलं आहे. त्यांनी प्राथमिकरित्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे, पण पोलिसांचा तपास सुरू आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी या हल्ल्याच्या तपासातून समोर आलेली माहिती दिली आहे. या दोन्ही आरोपींचं पार्श्वभूमी तपासली जात असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. या दोघांनाही मुंबईच्या भांडूपमधून ताब्यात घेतलं आहे. आरोपी महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेशी संबंधित असल्याचं आढळून आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५६ वर्षीय मुख्य आरोपीच्या नेतृत्वाखाली इतर तिघांनी हे कृत्य केलं आहे. मुख्य आरोपीचे नाव अशोक खरात असून दुसरा आरोपी किशन सोळंकी आहे. त्यांचं वय साधारण ३५ ते ४० वर्षे असून मुख्य आरोपी अशोक खरात हा महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल कामगार सेना यांचा उपाध्यक्ष आहे.