मनसेमध्ये 'आऊटगोईंग'ची आली लाट

mns
mns

मुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत चांगलीच पिछेहाट झालेल्या 'मनसे'मध्ये 'इनकमिंग' होण्याऐवजी अनेक पदाधिकाऱ्यांचे 'आउंटगोईंग' सुरु आहे. त्यातच दादर येथील मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटणकर यांची उचलबांगडी करुन त्यांच्या जागी संदीप देशपांडे यांची वर्णी लावल्यानंतर राज ठाकरे यांचे कृष्णकुंज इमारतीतील वास्तव्य असलेल्या माहिम विधानसभा मतदारसंघात मनसैनिकांमध्ये धुसफुस सुरु झाली आहे. 

दादरमध्ये शिवसेना भवन असल्याने सेनेने हा बालेकिल्ला अनेक वर्षे आपल्या ताब्यात ठेवला होता. मनसेच्या स्थापनेनंतर दादरचा किल्लेदार कोण? यावरुन संघर्ष झाला. परंतु, राज ठाकरे यांनी दादरवर आपलेच वर्चस्व असल्याचे 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: अभिनेता आदेश बांदेकर यांना दादर माहिम मतदारसंघातून उमदेवारी दिली होती. तरीही मनसेचे नितीन सरदेसाई येथून निवडून आले. त्यानंतर झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत माहिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मनसेचे नगरसेवक निवडून आल्याने मनसेचा हुरुप पुन्हा वाढला. 

दरम्यान, काँग्रेसमध्ये गेलेले सदा सरवणकर यांना पुन्हा स्वगृही घेउन त्यांच्यावर विभागप्रमुख पदाची जबाबदारी शिवसेनेने सोपविली. या बेरजेच्या राजकारणात 2014 मध्ये शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी पुन्हा दादरवर भगवा झेंडा फडकविला. या मतदारसंघात मनसेचे नगरसेवक असले तरी, मतदारांचा कल पुन्हा शिवसेनेकडे झुकाल असल्याने दोन ते तीन नगरसेवकांना पुढील काळ कठीण वाटत असल्याची खाजगीत चर्चा आहे. 

राज ठाकरे यांच्या जुन्या सहकाऱ्यांपैकी एक असलेले यशवंत किल्लेदार हे दादर मतदारसंघाचे पहिले विभाग अध्यक्ष होते. त्यांना विधानसभेचे किंवा महापालिकेचे तिकिट मिळेल अशी आशा होती. परंतु, तिकिट डावलल्याने ते नाराज होते. दादर येथील माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांना विभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, पाटणकर यांच्याऐवजी संदीप देशपांडे यांच्याकडे विभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

देशपांडे हे मुंबई महापालिकेत मनसेचे गटनेते आहेत. देशपांडे यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने पाटणकर यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरु ठेवले होते. दादर परिसरात त्यांनी केलेली पोस्टरबाजी ही कृष्णकुंज वर डोकेदुखी ठरली असावी. पक्षाच्या आदेशाशिवाय कोणालाही तिकिट दिले जाणार नाही, हा संदेश पाटणकर यांच्या उचलबांगडीतून राज ठाकरेंनी दिल्याची जोरदार चर्चा दादर परिसरात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com