मनसेचा गड उद्‌ध्वस्त

मनसेचा गड उद्‌ध्वस्त

दादरमध्ये शिवसेनेचा विजय; अनेक दिग्गजांना दणका
मुंबई - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील दादरवर आपला झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना व मनसे पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरले होते. गेल्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या गडावर झेंडा फडकवला होता. हा पराभव जिव्हारी लागल्याने यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने मनसे उमेदवारांसमोर तगडे उमेदवार दिले आणि दादरच्या गडावर पुन्हा भगवा फडकवला. मनसेचा गड विधानसभेनंतर महापालिकेतही उद्‌ध्वस्त झाला आहे.

या मतदारसंघात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह सुरेश गंभीर, वर्षा गायकवाड, राहुल शेवाळे, तृष्णा विश्‍वासराव यांनाही फटका बसला आहे. या मतदारसंघात माहीम, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, चेंबूर आणि अणुशक्तीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघातील 34 पैकी 18 जागांवर शिवसेनेने झेंडा फडकवत पुन्हा या मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केले आहे. या लोकसभा मतदारसंघातील दादर, धारावी, चेंबूर येथील लढतीकडे मुंबईकरांचे लक्ष होते. मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादरमध्ये शिवसेना आणि मनसेचे मुख्यालय आहे. त्यामुळे या विभागावर आपला झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना आणि मनसेत मोठी चुरस होती. शिवसेनेच्या उमेदवारांनी मनसेला चांगली टक्कर देत विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक 191 मधून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांचा विशाखा राऊत यांनी पराभव केला. यामुळे देशपांडे यांना धक्का बसला; तर 144 प्रभागात खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना भाजप उमेदवार अनिता पांचाळ यांनी पराभूत केले. धारावी मतदारसंघात कॉंग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांना शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीने दणका दिला. धारावी मतदारसंघातील सहापैकी केवळ दोन जागा राखण्यात कॉंग्रेसला यश आले. उमेदवारी न मिळाल्याने वकील शेख यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवत विजय मिळवला आहे; तर 189 क्रमांकाच्या प्रभागातून मनसे उमेदवार हर्षला मोरे यांनी सुरेश गंभीर यांच्या कन्येचा पराभव केल्याने सुरेश गंभीर यांना फटका बसला. गंभीर यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी 189 आणि 190 या प्रभागातून आपल्या दोन कन्यांसाठी महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवली. यापैकी 190 प्रभागातून शीतल गंभीर यांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 179 मधून सुफीयान वणू यांनी महापालिकेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांचा पराभव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com