Loksabha 2019 : मनसेचा पहिला लाभ काँग्रेस आघाडीला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 मार्च 2019

यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. तसेच "मी जो निर्णय घेईन त्याचा फायदा कुणालाही झाला तरी चालेल, मात्र मोदी आणि अमित शहा ही नावे देशाच्या राजकीय पटलावरून नाहीशी करण्यासाठी माझा पक्ष झटेल", असे राज यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुणाला फायदा होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनसेचा पहिला लाभ काँग्रेसला होईल असे आज दिसून आले. उत्तर मुंबईतून काँग्रेसचा उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. तसेच "मी जो निर्णय घेईन त्याचा फायदा कुणालाही झाला तरी चालेल, मात्र मोदी आणि अमित शहा ही नावे देशाच्या राजकीय पटलावरून नाहीशी करण्यासाठी माझा पक्ष झटेल", असे राज यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांची सभा 6 एप्रिल रोजी मनसेच्या गुडी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने होत आहे. त्यावेळी ते निवडणुकीच्या अनुषंगाने अधिक भाष्य करण्याची शक्यता आहे. तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लाभ काँग्रेस आघाडीला होण्याचे संकेत आहेत. आज सकाळी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड शिवाजी पार्क येथे प्रचार फेरीला गेले असता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांचे स्वागत केल्याचे समजते. तसेच देशपांडे - गायकवाड यांचा फोटो सोशल मीडियावर झळकत आहे.

दुसरीकडे शालिनी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांचे कौतुक केले असून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. उर्मिलाला उद्देशून काय म्हणतात शालिनी बघूया :- 
प्रिय ऊर्मिला,

सस्नेह जय महाराष्ट्र !

स्वतः तील अंगभूत अभिनयगुणांच्या जोरावर एक अभिनेत्री म्हणून तू स्वतःचा स्वतंत्र ठसा बॉलीवूडवर उमटवलास. अनेक उत्तमोत्तम सिनेमे तुझ्या वाट्याला आले आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचं तू सोनं केलंस. 

आज काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून तुझं नाव जाहीर केलंय. राजकारणात सक्रिय होण्याचा हा निर्णय तू निश्चितच संपूर्ण विचारांती घेतला असशील.   या निवडणुकीच्या निमित्ताने तुझ्यासारखं एक संवेदनशील व्यक्तिमत्व राजकारणात आल्याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. 

महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना-समस्यांना आवाज  फोडण्यासाठी तुझ्यामुळे  मदत होईल, याची खात्री आहे.

तुझ्या या नव्या इनिंगला 'मनसे' शुभेच्छा!

सौ शालिनी जितेंद्र ठाकरे
सरचिटणीस
महाराष्ट्र नवनिर्माण सेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS supports Congress candidate Urmila Matondkar in North Mumbai