
Raj Thackeray : कसब्यात मनसेचा होता भाजपला पाठिंबा, तरी धंगेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण
मुंबई - पुण्यातील कसबा पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात चर्चिलेली निवडणूक ठरली. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते कसब्यात तळ ठोकून होते. मात्र काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपला धक्का देत कसब्यात विजय मिळवला. या विजयानंतर धंगेकरांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.
रवींद्र धंगेकर यांनी आज शिवतिर्थवर जावून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी हे देखील उपस्थितीत होते. २०१७ साली मनसे सोडून धंगेकर यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता.
कसब्यातील पोट निवडणुकीत धंगेकरांना मनसेच्या स्थानिक नेत्यांचा पाठिंबा मिळणार अशी चर्चा होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. शिवाय धंगेकरांचं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टीही मनसेने केली होती. मात्र तरी देखील धंगेकर यांनी भाजपच्या हातून विजयश्री खेचून आणला.
दरम्यान या विजयानंतर धंगेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीपूर्वी धंगेकरांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.