मतदान केंद्रात मोबाईल वापरास मनाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

मोबाईल फोन, कॅमेरा, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू व गॅझेट यांचा वापर करण्यास भारत निवडणूक आयोगाने सक्त मनाई केली असल्याने या दिवशी कोणीही मतदान केंद्रांवर मोबाईल वापरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. 

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात सोमवारी (ता. 21) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर विधानसभेतील उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतदार यांना मोबाईल फोन, कॅमेरा, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू व गॅझेट यांचा वापर करण्यास भारत निवडणूक आयोगाने सक्त मनाई केली असल्याने या दिवशी कोणीही मतदान केंद्रांवर मोबाईल वापरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. 

मतदान करण्यासाठी मतदारांकडे मतदान ओळखपत्र आवश्‍यक असून ते नसल्यास पारपत्र, वाहनचालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बॅंकेचे पासबुक, पॅनकार्ड, एपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृतीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड आदींपैकी कोणतेही एक दस्तावेज हे ओळखीचा पुरावा म्हणून मतदान केंद्रावर सादर करावे. मतदानासाठी देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. 

मतदारयादीत नाव असणे आवश्‍यक 
केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही, तर मतदारयादीत आपले नाव समाविष्ट असणे आवश्‍यक आहे. याबाबत मतदारांनी आपले नाव नोंदणी अथवा पडताळणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदारांना देण्यात आलेली छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही; तर त्यासोबत मतदार छायाचित्र ओळखपत्र अथवा वर दिलेल्या 11 दस्ताऐवजांपैकी कोणतेही एक दस्तावेज सादर करणे आवश्‍यक राहील. प्रवासी भारतीयांनी ओळख म्हणून केवळ पासपोर्टची मूळ प्रत सादर करणे आवश्‍यक असेल, असेही कळविण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile access to polling stations is prohibited