कारवाईच्या "रेंज'मध्ये मोबाईल टॉवर 

मयूरी चव्हाण-काकडे : सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

कल्याण - अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा कर थकवणाऱ्या मोबाईल टॉवर कंपन्यांना पालिकेने नोटिसा पाठविल्या आहेत. 15 दिवसांत कर न भरल्यास मोबाईल टॉवर सील करण्याचा इशाराही दिला आहे. सोमवारपासून (ता. 2) पालिकेने हाती घेतलेल्या या कारवाईत रिलायन्स कंपनीचे एकूण चार टॉवर सील करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेतील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

कल्याण - अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा कर थकवणाऱ्या मोबाईल टॉवर कंपन्यांना पालिकेने नोटिसा पाठविल्या आहेत. 15 दिवसांत कर न भरल्यास मोबाईल टॉवर सील करण्याचा इशाराही दिला आहे. सोमवारपासून (ता. 2) पालिकेने हाती घेतलेल्या या कारवाईत रिलायन्स कंपनीचे एकूण चार टॉवर सील करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेतील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

महानगरपालिका परिसरात एटीसी, बीपीएल, चेन्नई नेटवर्क, इंडस टॉवर, महानगर टेलिफोन, रिलायन्स आणि टाटा अशा कंपन्यांचे एकूण 428 मोबाईल टॉवर आहेत. या मोबाईल टॉवर कंपन्यांनी वर्षानुवर्ष पालिकेचा कोट्यवधींचा भरणा केलेला नाही. हे प्रकरण कायदेशीर प्रक्रियेमध्ये प्रलंबित असल्यामुळे पालिकेला या टॉवरवर कारवाई करण्यास अडसर निर्माण झाला होता; मात्र 16 डिसेंबर 2016 ला उच्च न्यायालयाने मोबाईल टॉवरच्या कारवाईवरील स्थगिती उठवल्याने पालिकेने या करचुकव्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. व्याजासह कराची रक्कम न भरल्यास काही दिवसांत अनेक मोबाईल टॉवर पालिकेकडून सील करण्यात येणार आहेत. 

शहाड येथील दोन, तर मांडा आणि मोहने येथील प्रत्येकी एक अशा रिलायन्स कंपनीच्या चार टॉवरवर पालिकेने कारवाई केली आहे. करचुकवेगिरीमध्ये एटीसी, इंडस, रिलायन्स या कंपन्या अग्रस्थानी, तर महानगर टेलिफोन कंपनीकडे सर्वांत कमी कराचा भरणा शिल्लक आहे. यातील बीपीएल कंपनी बंद झाल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. रिलायन्स वगळता बाकी कंपन्यांनी कराच्या रकमेचा काही भरणा केला असून, उर्वरित भरणा न केल्यास पुढील आठवड्यात कारवाई जोरात होईल. 

मोबाईल टॉवर कंपन्यांनी वर्षानुवर्ष केडीएमसीचा कोट्यवधींचा कर थकवला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कारवाईचा मार्ग सोपा झाला आहे. सर्व कंपन्यांवर कारवाई करून व्याजासकट सर्व रक्कम वसूल करण्याचा महापालिका प्रयत्न करत आहे. 
ई रवींद्रन, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका.

कर चुकवणाऱ्या कंपन्यांची नावे आणि रक्कम 
कंपनीचे नाव - टॉवरची संख्या - शिल्लक कराची रक्कम 
एटीसी टॉवर - 65 - 12 कोटी 16 लाख 
बीपीएल - 7-  58 लाख 87 हजार 
चेन्नई नेटवर्क - 21-  5 कोटी 36 लाख 
इंडस टॉवर - 196 - 21 कोटी 73 लाख 
महानगर टेलिफोन -  45 - 1 कोटी 24 लाख 
रिलायन्स - 39 - 11 कोटी 30 लाख 
टाटा - 55 -  8 कोटी 38 लाख 

Web Title: Mobile tower in the Range action