ठाण्यात आधुनिक टेकबिन कचरापेटी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

ठाणे - स्वच्छ भारत अभियानाद्वारे नागरिकांना शहरात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी कचरापेटी सहज मिळावी. तसेच ठाणे शहराला स्वच्छ शहर, सुंदर शहर बनवण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतादूत बनावे, असा संदेश देत महापलिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी "टेकबिन' या आधुनिक कचरापेटीचे लोकार्पण केले. 

ठाणे - स्वच्छ भारत अभियानाद्वारे नागरिकांना शहरात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी कचरापेटी सहज मिळावी. तसेच ठाणे शहराला स्वच्छ शहर, सुंदर शहर बनवण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतादूत बनावे, असा संदेश देत महापलिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी "टेकबिन' या आधुनिक कचरापेटीचे लोकार्पण केले. 

नागरिकांनी कचरापेटीचा जास्तीत जास्त वापर करावा म्हणून ठाणे महापालिकेने हे पाऊल उचलले असून याद्वारे "स्वच्छ ठाणे, हरित ठाणे' होण्यास मदत होणार आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. सार्वजनिक ठिकाणी पडणारा कचरा प्रभावीपणे नियंत्रित झाल्यास सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहून महापालिकेच्या साफसफाईवर होणाऱ्या खर्चात बचत होईल. यानुसार मे. एशियन गॅलंट एलएलपी (ASSIAN GALLANT LLP) या संस्थेने निर्मिती केलेल्या आधुनिक कचरापेट्या शहरात सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. 

एकूण 200 टेकबिन ठाणे महापालिका क्षेत्रात लावण्यात येणार असून पहिल्या टप्यात 100 टेकबिन लावण्यात येणार आहेत. या आधुनिक कचरापेट्या तयार करणे व नियमित वापरण्याचा खर्च पेट्यांवर प्रदर्शित करण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून भागवता येणार आहे. या कचरापेट्या तीन बाय तीन फूट जागेत उभारण्यात येणार आहेत. या टेकबिनमध्ये ओला व सुका कचरा टाकण्यासाठी दोन कप्पे आहेत. टेकबिन आधुनिक कचरापेटीतील कचरा साठवणुकीची मुख्य पिशवी भरल्यावर ही पिशवी काढून मोठ्या कचरापेटीत किंवा कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीत टाकली जाणार आहे. 

"कचरा टाका आणि सोने जिंका' 
स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालिकेच्या टेकबिनच्या माध्यमातून "कचरा टाका आणि सोने जिंका' अशी आगळीवेगळी योजना सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन टेकबिन हे ऍप डाऊनलोड करावे. यावर नागरिकांना जवळचे टेकबिन कोठे आहे, याची माहिती मिळणार आहे. नागरिकांनी टेकबिनमध्ये कचरा टाकल्यावर एल.ई.डी. स्क्रीनवर आलेल्या कोडचा ऍपमधील विन टब कमेऱ्याने फोटो काढून हा कोड टेकबिनच्या सर्व्हरला पाठवल्यास आपण या टेकबिनचा वापर करत असल्याची नोंद होणार आहे. त्यातून टेकबिन वापरणाऱ्या नागरिकांकडून निवडण्यात येणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना सोन्याचे नाणे बक्षीस रूपात देण्यात येईल. या कचरापेटीचा जास्तीत जास्त तसेच नियमितपणे वापर केल्यावर अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या ऑफर्सही मिळणार आहेत. 

Web Title: Modern tech bin garbage in Thane