Modi Cabinet : पूर्वीप्रमाणे सन्मानाची शिवसेनेला अपेक्षा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 मे 2019

दोन पदांची आशा
यंदाच्या निवडणुकीत पुन्हा युती करण्यासाठी भाजपने शिवसेनेला योग्य सन्मान देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्या अनुषंगाने अरविंद सावंत यांचा कॅबिनेटमध्ये आज समावेश करण्यात आला. मात्र पुढील विस्तारात एक कॅबिनेट आणि आणखी एक राज्यमंत्रिपद मिळेल, अशी माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

मुंबई - दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मिळालेला मानसन्मान मोदी सरकारमध्येही मिळेल, अशी शिवसेनेला अपेक्षा आहे. 

वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीएची १९९६ पासून २००४ पर्यंत तीन टप्प्यांत केंद्रात सत्ता होती. या वेळी भाजपचा सर्वांत जुना मित्र पक्ष शिवसेनेला केंद्राच्या सत्तेतील योग्य वाटा मिळाला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असल्याने शिवसेनेला नाराज करणे कुणाही भाजप नेत्याला शक्‍य नव्हते. तसेच वाजपेयी यांची कार्यशैलीही कुणाला न दुखावण्याची असल्याने शिवसेनेला योग्य मानसन्मान मिळत होता. त्या वेळी शिवसेनेचे मनोहर जोशी, बाळासाहेब विखे-पाटील, आनंदराव अडसूळ, सुबोध मोहिते, सुरेश प्रभू यांनी वाजपेयी यांच्यासोबत मंत्रिमंडळात काम केले होते. त्यांच्याकडे अवजड उद्योगसह ऊर्जा, अर्थ राज्यमंत्री खात्यांची जबाबदारी होती. मनोहर जोशी यांना लोकसभेचे अध्यक्ष म्हणूनही नियुक्‍त केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi Cabinet Shivsena Minister Post Politics