'मोदी सरकारचे रिचार्ज फक्त पाच वर्षांचे'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

मुंबई - मोदी सरकार आयुष्यभराचे नाही. या सरकारचे "रिचार्ज' फक्त पाच वर्षांसाठी आहे. त्यातही अडीच वर्षांचा टॉकटाइम संपला आहे. त्यामुळे अंगठा दाबून नेटबॅंकिंग करा, असे सांगणाऱ्या या सरकारला व्होटिंग मशिनवर अंगठा दाबून खाली उतरवा, अशा शब्दांत अखिल भारतीय छात्र परिषदेचा नेता कन्हैया कुमारने केंद्र सरकारवर शुक्रवारी टीका केली. 

मुंबईत आझाद मैदानात महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या सभेत बोलताना त्याने सरकारी कारभारावर टीका केली. तो म्हणाला, की नरेंद्र मोदींचे भक्त असलेल्या व्हॉट्‌सऍप प्रेमींनी हे ध्यानात घेतले पाहिजे, की व्हॉट्‌सऍपवरील सगळे खरे नसते. नोटाबंदीमुळे काळा पैसा जमा होत आहे, असे सांगण्यात येत असले तरी जोपर्यंत 15 लाख रुपये प्रत्येक भारतीयाच्या खात्यात येत नाहीत, तोपर्यंत सरकारवर विश्‍वास ठेवता येणार नाही. "गतिमान सरकार' म्हणून फडणवीस राज्यात कारभार करत असल्याचे सांगत आहेत; पण या सरकारकडे मती नाही, तर गती येईलच कशी, अशी बोचरी टीका त्याने केली. महागाईची झळ सामान्य माणसांना बसत आहे. त्याच्याशी या नेत्यांना काही घेणे-देणे नाही, असेही तो म्हणाला. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम केले जात नाही. सफाई कर्मचारी सकाळी तुमचा कचऱ्याचा डबा साफ करू शकतो, तर तोच तुम्हाला बदलूही शकतो, असे कन्हैया कुमार म्हणाला. मुंबई व ठाणे महापालिकेतील 7 हजार 500 कंत्राटी सफाई कामगारांना राज्य सरकारने फेब्रुवारी 2015 मध्ये किमान वेतन देण्याचे जाहीर केले होते. राज्यातील अन्य महापालिका व नगरपालिकांतही हीच परिस्थिती आहे. पाठपुरावा करूनही तिथे किमान वेतन दिले जात नाही. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज असल्याने कामगार आणि विद्यार्थ्यांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्याने केले. 

Web Title: Modi government recharge only five years old