मेट्रो भूमिपूजनानंतर मोदींची जाहीर सभा ?
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या कल्याण मेट्रोच्या कामाचा मुहूर्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या संदर्भात जागा निश्चितीसाठी चाचपणी करण्यात येत आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर कल्याण शहरातील फडके मैदानावर पंतप्रधानांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्त तसेच अधिकारी यांच्या समवेत घेतलेल्या आढावा बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.

2016 मध्ये ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाला प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. कल्याण मेट्रो 5चा मार्ग 24 किलोमीटरचा असून यासाठी 8416 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर सतरा स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. यापूर्वी ठाणे तसेच मुंबई येथे पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. आता पाचव्या मार्गाचेही पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र या चाचपणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच भाजपमधील बडे नेते कामास लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज आढावा बैठक घेतली. या प्रस्तावित पाचव्या मार्गात दुर्गामाता चौक येथे स्थानक प्रस्तावित करण्यात आले असून तेथूनच जवळ असलेल्या फडके मैदानात पंतप्रधानांची जाहीर सभा घेण्यात येण्याची शक्यता आहे.
2019 मधील निवडणुका नजरेसमोर ठेवत येणाऱ्या काळात सत्ताधारी पक्षाकडून विविध कामांच्या भूमीपूजनाचा धडाका सुरु होणार हे निश्चित. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदी यांनी याच मैदानावर सभा घेतली होती. 2019 साठी पुन्हा एकवार कल्याण शहरात सभा घेऊन ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये पंतप्रधान उत्साह निर्माण करतील अशी अपेक्षा आहे.