बाबूजींची उत्कृष्टता मनाला भिडली! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

मुंबई - "उत्कृष्टतेमागची तपस्या किती खडतर असते हे बाबूजींमुळे समजले. त्यामुळेच त्यांची उत्कृष्टता मनाला भिडली', असे उद्‌गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी विख्यात संगीतकार, गायक स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभ सोहळ्यात काढले. 

मुंबई - "उत्कृष्टतेमागची तपस्या किती खडतर असते हे बाबूजींमुळे समजले. त्यामुळेच त्यांची उत्कृष्टता मनाला भिडली', असे उद्‌गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी विख्यात संगीतकार, गायक स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभ सोहळ्यात काढले. 

सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाला बुधवारी रवींद्र नाट्य मंदिरातील विशेष कार्यक्रमाने सुरुवात झाली. त्यावेळी भागवत बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, नागालॅंडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, प्रख्यात गायक सुरेश वाडकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सुधीर फडके यांचे पुत्र गायक श्रीधर फडके, श्रीनिवास वीरकर आणि "जीवनगाणी'चे प्रसाद महाडकर यांनी केले होते. 

सुरुवातीला श्रीधर फडके यांनी जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर होणार असलेले कार्यक्रम, बाबूजींच्या वेबसाईटचे पूर्ण होत आलेले काम, त्यांच्या जीवनावर आधारित "बायोपिक' याविषयी माहिती दिली. यावेळी भागवत यांच्या हस्ते जीवनगाणी प्रकाशित व विश्‍वास नेरुलकर संपादित "स्वरतीर्थ सुधीर फडके' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. प्रत्येक गाण्याला भाव असतो, त्यानुसार शब्द असतात, स्वर समजून ते गाणे म्हणायची पद्धत असते, हे बाबूजींनी नवोदितांच्या मनावर बिंबवले, ते म्हणाले. 

सुधीर फडके, ग. दि. माडगुळकर व पु. ल. देशपांडे या तिघांचेही जन्मशताब्दी वर्ष राज्य सरकारतर्फे एकत्रितपणे 25 जुलै 2018 ते 8 नोव्हेंबर 2019 या काळात साजरे केले जाणार आहे. त्यासाठी जन्मशताब्दी समितीची स्थापना करण्यात आली आहे. साहित्य-संस्कृतीचा हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा म्हणून तालुका स्तरावर कार्यशाळा घेतल्या जातील. या तिघांच्याही नावे नाट्यगृहे उभारली जातील, अशी घोषणा तावडे यांनी केली. 

विधिमंडळात ठराव 
विनोद तावडे म्हणाले की, बाबूजींचा वारसा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपल्यापुढील आव्हान आहे. गदिमा, पु. ल. देशपांडे व बाबूजी या तिघांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठराव विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात एकमताने मांडला जाईल. 

काशीत कार्यक्रम 
लखनऊ व देशाची सांस्कृतिक राजधानी काशी येथे दोन दिवस गीतरामायण, तर एक दिवस बाबूजींची गाणी असा कार्यक्रम घेतला जाईल, अशी घोषणा राम नाईक यांनी केली.

Web Title: mohan bhagwat sudhir phadke exquisiteness