जप्त केलेले सहा कोटी रुपये "हवाला'चे?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर झवेरी बाजार व ऑपेरा हाऊस परिसरातून जप्त करण्यात आलेल्या सुमारे सहा कोटी रुपयांवर अद्याप कोणीही दावा केलेला नाही. त्यामुळे ही रक्कम हवाला व्यवहारातील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर झवेरी बाजार व ऑपेरा हाऊस परिसरातून जप्त करण्यात आलेल्या सुमारे सहा कोटी रुपयांवर अद्याप कोणीही दावा केलेला नाही. त्यामुळे ही रक्कम हवाला व्यवहारातील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने मुंबईतून 14 कोटी आणि पुण्यातून चार कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्राप्तिकर विभागाने राज्यभर कारवाई करून 40 कोटींहून अधिक बेहिशेबी रक्कम जप्त केली आहे. मुंबईतील झवेरी बाजार व ऑपेरा हाऊस हे परिसर आर्थिकदृष्ट्या संवेदनशील समजले जातात. निवडणुकीच्या काळात या ठिकाणी प्राप्तिकर विभागाची करडी नजर असते. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर ऑपेरा हाऊस येथे एका आणि झवेरी बाजार येथे चार ठिकाणी कारवाई करण्यात आली.

झवेरी बाजार येथील एका गाळ्यावर छापा टाकण्यात आला. त्या वेळी तेथील एका बॅगेत सुमारे अडीच कोटींची बेहिशेबी रक्कम सापडली होती. ती रक्कम आपली नसल्याचा दावा गाळेमालकाने केला होता. प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत जप्त केलेल्या रकमेपैकी सुमारे सहा कोटी रुपयांवर अद्याप कोणीही दावा केलेला नाही. या परिसरात अंगडिया व्यावसायिकांचे मोठे जाळे असून, हवाला व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो. ही रक्कम त्यातील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया
आतापर्यंत मुंबईतून 14 कोटी आणि पुण्यातून सुमारे चार कोटींची बेहिशेबी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. त्यातील काही रकमेवर अद्याप कोणीही दावा केलेला नाही.
- संतोष माणकोसकर, सहायक संचालक (अन्वेषण), प्राप्तिकर विभाग

Web Title: Money Seized Hawala Crime