esakal | मुंबईतील हाताचे पहिले प्रत्यारोपण, मोनिका मोरेच्या हातांची शस्त्रक्रिया सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

घाटकोपर रेल्वेस्थानक परिसरात 2014 साली ट्रेनखाली येऊन अपघात झालेल्या 24 वर्षीय मोनिका मोरे हीच्या हातांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सध्या सुरु आहे. मुंबईतील हे पहिले हाताचे प्रत्यारोपण ठरणार आहे. ग्लोबल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया सुरु असून सायंकाळी चार वाजेपर्यंत ही शस्त्रक्रिया संपेल, अशी माहिती मोनिकाचे मामा विश्वास जाधव यांनी दिली आहे. 

मुंबईतील हाताचे पहिले प्रत्यारोपण, मोनिका मोरेच्या हातांची शस्त्रक्रिया सुरु

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : घाटकोपर रेल्वेस्थानक परिसरात 2014 साली ट्रेनखाली येऊन अपघात झालेल्या 24 वर्षीय मोनिका मोरे हीच्या हातांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सध्या सुरु आहे. मुंबईतील हे पहिले हाताचे प्रत्यारोपण ठरणार आहे. ग्लोबल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया सुरु असून सायंकाळी चार वाजेपर्यंत ही शस्त्रक्रिया संपेल, अशी माहिती मोनिकाचे मामा विश्वास जाधव यांनी दिली आहे. 

गुरुवारी सायंकाळी मोनिका प्रत्यारोपणासाठी ग्लोबल रुग्णालयात दाखल झाली. त्यानंतर, त्याच रात्री दोनच्या नंतर तिच्यावर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली. गुरुवारी चेन्नईतील ग्लोबल रुग्णालयात एका 30 वर्षीय व्यक्तीला ब्रेन डेड घोषित केले गेले. त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी दोन्ही हात दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, दोन्ही हात मुंबईत आणले गेले. 

मुंबईतील डॉक्टरांनी सांगितले की, त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्याचे दोन्ही हात दान करण्यास तयारी दाखवली. त्यानंतर, गुरुवारी रात्री उशिरा चार्टर्ड विमानाने ते हात मुंबईला आणण्यात आले. रात्री 1.40 वाजेपर्यंत हे विमान मुंबईत उतरले आणि 15 मिनिटात ग्रीन काॅरिडोर करुन ते ग्लोबल रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्याच रात्री शस्त्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला.

तिला संध्याकाळी रुग्णालयातून कॉल आला. आम्ही सर्व चारच्या दरम्यान रुग्णालयात दाखल झालो. त्यानंतर, मोनिकाच्या काही चाचण्या केल्या गेल्या. कोरोना टेस्ट, एचआयव्ही अशा बऱ्याच चाचण्या केल्या गेल्यानंतर तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. शस्त्रक्रियेआधी सर्व प्रक्रिया पार पडली असे मोनिकाचे मामा विश्वास जाधव यांनी सांगितले. 

ग्लोबल रुग्णालयाचे प्लास्टिक सर्जन डॉ. निलेश सातभाई शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सांगितले होते की, ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि आम्ही सर्व तयारी केली आहे. 2014 मध्ये घाटकोपर स्टेशनवर चालणार्‍या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मोनिकाचे हात ट्रेनखाली आले. ट्रेन आणि प्लॅटफार्ममध्ये असणाऱ्या अंतरांमधून ती घसरुन खाली पडली. त्यावेळेस तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळेस तिच्या कोपराच्या वरच्या भाग काढून टाकण्यात आला.

त्यानंतर तिला कृत्रिम हात बसवले गेले. परंतु, सामान्यत: त्यांच्याबरोबर काम करणे तिला शक्य होत नव्हते. म्हणून तिचे वडिल अशोक मोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या शस्त्रक्रियेसाठी निधी गोळा करत होते. मात्र, गेल्या वर्षी किडनीच्या आजारामुळे त्यांनी आपला जीव गमावला. या शस्त्रक्रियेसाठी 25 लाख रुपये एकूण खर्च सांगण्यात आला आहे.

हात प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला किमान 12 ते 14 तास लागतात. प्लास्टिक सर्जन आणि प्रत्यारोपण शल्यचिकित्सकांचे पथक मिळुन एकत्रितपणे हाड, नंतर दोन रक्तवाहिन्या, सहा नसा आणि अनेक स्नायूंना एकत्रित करण्याची शस्त्रक्रिया केली जात आहे. (अप्पर आर्म ट्रान्सप्लांट्स) मनगटातील प्रत्यारोपणापेक्षा विविध नसा, स्नायू आणि रक्तवाहिन्या अचूकपणे ओळखून त्या जोडण्यात गुंतागुंत असते आणि ही एक आव्हानात्मक शस्त्रक्रिया असते असे डॉक्टरांनी सांगितले. शिवाय, पुढचे प्रत्यारोपण मनगटातून केले जाईल. ज्यामुळे त्याला पुनर्वसनासाठी जास्त वेळ लागू कतो. 

मोनिकाचा 2014 मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे, डॉक्टरांना संशय आहे की तिने मज्जातंतू संवेदना गमावल्या आहेत आणि पुनर्वसनासाठी आणखी एक वर्ष जाईल. तसेच, एक पुरुषाचा हात एका महिलेचा शरीरात प्रत्यारोपित केला जात असल्यामुळे शरीर ते हात स्विकारण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. 

सध्या अवयव दानामध्ये हात दान होण्याची संख्या फक्त एक अंकी आहे. शिवाय, हात प्रत्यारोपणाचे प्रमाण ही अगदी कमी आहे. त्यामुळे, लोकांनी अवयव दाना सोबत हात दान करण्यासाठी ही पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन रोटोचे प्रमुख डॉ. अ‍ॅस्ट्रिड लोबो यांनी केले आहे. 

प्रत्यारोपणानंतर दरवर्षी दोन लाखांचा खर्च... 

मोनिकाला हात जरी लावले तरी दरवर्षी तिच्या औषधांचा खर्च दोन लाखांहून अधिक येणार आहे. सध्या तिच्या शस्त्रक्रियेसाठी 25 लाखांचा खर्च रुग्णालयातून सांगण्यात आला आहे. मात्र, शस्त्रक्रिया यशस्वी झाली की पुर्ण खर्च सांगितला जाईल जो वाढू देखील शकतो, असे मोनिकाचे मामा विश्वास जाधव यांनी सांगितले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image