विशिष्‍ट अटींच्या पूर्ततेनंतर धावणार मोनो

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मुंबई - चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यान मोनो रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी सुरक्षेचे प्रमाणपत्र दिले आहे; मात्र काही विशिष्ट अटींची पूर्तता केल्यावरच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल.

मुंबई - चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यान मोनो रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी सुरक्षेचे प्रमाणपत्र दिले आहे; मात्र काही विशिष्ट अटींची पूर्तता केल्यावरच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल.

मोनो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यातील चेंबूर ते वडाळा मार्गावरील मोनोच्या दोन डब्यांत लागलेल्या आगीमुळे नोव्हेंबरपासून मोनो रेल बंद ठेवण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई शहर विकास प्राधिकरणाने वडाळा ते जेकब सर्कलपर्यंतच्या मार्गाचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यावर मोनो सुरू करण्याचे ठरविले आहे. सध्या एमएमआरडीएकडे मोनोचे १० रॅक आहेत. अजून पाच रॅक घेण्याच्या तयारीत आहे. त्यापैकी फक्त सहा रॅकच कार्यरत राहतील.

एमएमआरडीएने गाडीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही भाग तैनात केले पाहिजेत. जेणेकरून गाडीच्या नियमित देखभालीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, असे सुरक्षा निरीक्षक जी. पी. गर्ग यांनी म्हटले. गर्ग यांनी २८ मार्चला मोनोची चाचणी घेतली.

गुरगावमध्ये मोनो रेल चालवणाऱ्या व देखभाल करणाऱ्या आयएल ॲण्ड एफएस लिमिटेड कंपनी वडाळा ते जेकब सर्कलपर्यंतचा पट्टा या महिन्यापासून चालवणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या एल ॲण्ड टी व स्कोमी इंजिनिअरिंग कंपनीचे कंत्राट २०१३ लाच संपुष्टात आले आहे.

आम्हाला मोनो रेल चालवण्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे; मात्र अहवालाची प्रतीक्षा करतोय. त्यानुसार काही अटींची पूर्तता करणे बाकी आहे. त्यानंतर मोनो केव्हा सुरू होईल याची तारीख निश्‍चित केली जाईल, अशी माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली.

सुरक्षात्मक बाबी
गाडी सुरू करण्यापूर्वी चालकाला फलाटावरील प्रवाशांची नेमकी स्थिती दिसण्यासाठी मोनोच्या फलाटांच्या शेवटी आरसे लावण्यात यावेत. तापमान मोजणारे यंत्र मोनोच्या रॅकमध्ये बसवण्यात यावे; जेणेकरून जास्त उष्णता वाढल्यास वेळीच गाडी खाली करता येईल. अत्यावश्‍यक वेळी मदतीसाठी फलाटाच्या दोन्ही टोकांना व मोनो रेल्वेच्या संपूर्ण परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे. तसेच आगीची माहिती मिळण्यासाठी ॲलर्ट म्हणून स्मोक डिटेक्‍टरही मोनोत बसवण्यात येईल.

Web Title: Mono to run after the fulfillment of certain conditions