मॉन्सून 6 जूनला राज्यात? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या पूर्वमोसमी पावसामुळे 6 ते 8 जून या कालावधीत मॉन्सूनचे आगमन होईल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे. 

मुंबई - राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या पूर्वमोसमी पावसामुळे 6 ते 8 जून या कालावधीत मॉन्सूनचे आगमन होईल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे. 

मॉन्सूनने रविवारी बंगालच्या उपसागराचा नैर्ऋत्य, ईशान्य, पश्‍चिम व पूर्व-मध्य भाग व्यापला; तर त्रिपुराच्या बहुतांश भागांत मॉन्सूनचे आगमन झाल्याची घोषणा केंद्रीय वेधशाळेने केली आहे. राज्यातही पूर्वमोसमी पावसाचा जोर सुरू आहे. उत्तर कोकणाला पूर्वमोसमी पावसाने शनिवारी सायंकाळनंतर चांगलेच झोडपले. मुंबईत शनिवारी रात्री 26 मि.मी. पावसाची नोंद झाली. काही दिवसांपूर्वी 36 अंशांवर पोहोचलेले कमाल तापमानही पावसामुळे आता खाली सरकल्याचे दिसून येत आहे.

रविवारी कमाल पारा 34.6 अंश सेल्सिअसवर; किमान पारा चार अंशांनी खाली येत 23 अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला. दररोज सायंकाळी आणि रात्री मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटांसह पूर्वमोसमी पावसाचा मारा मुंबईत सुरूच राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसासह सोसाट्याचा वारा वाहेल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

Web Title: Monsoon on June 6 in the state