"बेस्ट'ला मासिक 100 कोटींचे अनुदान 

"बेस्ट'ला मासिक 100 कोटींचे अनुदान 

मुंबई - आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या "बेस्ट' उपक्रमास मुंबई महापालिका दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त वेतन तसेच सुधारणांसाठी हे पैसे वापरणे बंधनकारक आहे. या पैशांचा विनियोग कसा झाला, याचा दर महिन्याला आढावा घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या गटनेत्यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत "बेस्ट'ला हा निर्णय घेण्यात आला. 

"बेस्ट'ला वार्षिक 900 कोटी रुपयांचा तोटा होतो. या उपक्रमावर दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देण्यासाठीही पैसे नसल्याने "बेस्ट'ला बॅंकांकडून कर्ज घ्यावे लागते. मात्र वित्तसंस्था "बेस्ट'ला कर्ज देण्यासही तयार नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन मिळणेही अवघड झाले आहे. त्यामुळे "बेस्ट'ला दोन हजार कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी सर्व पक्षांचे नगरसेवक तसेच कामगार संघटनांनी केली होती. मात्र मदत न देता "बेस्ट'ने कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची सूचना माजी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केली होती. पालिकेचे नवे आयुक्त प्रविण परदेशी यांनी पदभार स्वीकारताना "बेस्ट'बाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या दालनात गुरुवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत आयुक्तांनी "बेस्ट'ला 100 कोटी रुपयांचे मासिक अनुदान देण्याची तयारी दाखवली. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढील महिन्यात आयुक्त व "बेस्ट'च्या महाव्यवस्थापकासोबत आणखी एक बैठक घेणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. 

अनुदानाच्या बदल्यात भाड्याच्या बस? 
"बेस्ट'ला वाचवण्यासाठी पालिकेने सुचवलेल्या उपायांमध्ये कर्मचाऱ्यांचे भत्ते कमी करणे, काही पदे कमी करणे, बस भाड्याने घेणे आदींचा समावेश होता. मात्र, बस भाड्याने घेण्यास कामगार संघटनांनी विरोध केला होता. मात्र, हे 100 कोटी रुपये अनुदान देण्याच्या बदल्यात बस भाड्याने घेण्याचा पर्याय स्वीकारला जाऊ शकतो. "बेस्ट'ला सध्या सहा हजार बसची आवश्‍यकता आहे. त्या भाड्याने घेण्याचा पर्याय आयुक्तांनी मांडला आहे. 

अर्थसंकल्पाच्या विलिनीकरणास आयुक्त अनुकूल! 
"बेस्ट'चा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याची मागणी गटनेत्यांच्या बैठकीत करण्यात आली. त्यास आयुक्तांनी अनुकूल प्रतिसाद दिला असल्याचा दावा महापौरांनी केला. मात्र, सहा सात महिने परिस्थितीचा अंदाज घेऊन याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com