चंद्रावर जमिनीची खरेदी, ताऱ्यांना नावं देण्याचा प्रकार बोगस : खगोलतज्ञ दा.कृ. सोमण

45 डॉलरमध्ये मध्ये चंद्रावर जमिन खरेदी करता येते, तर 100 डॉलर खरेदी केले तर आकाशातील तारकाला तुमचे नाव दिले जाते.
चंद्रावर जमिनीची खरेदी, ताऱ्यांना नावं देण्याचा प्रकार बोगस : खगोलतज्ञ दा.कृ. सोमण

डोंबिवली : लघुग्रह आदळून पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होणार, जगबुडी होणार...या अफवांबरोबरच चंद्रावर प्लॉट्स खरेदी करा...जन्मराशीप्रमाणे आकाशातील तारकांना तुमचे नाव देऊ शकता...हे प्रकार जे सध्या सुरु आहेत ही निव्वळ फसवेगिरी आहे. 45 डॉलरमध्ये मध्ये चंद्रावर जमिन खरेदी करता येते, तर 100 डॉलर खरेदी केले तर आकाशातील तारकाला तुमचे नाव दिले जाते. ही निव्वळ फसवेगिरी असून त्या संस्था बोगस आहेत. पैसे कमविण्याचा वेगळा व्यवसाय त्यांनी सुरु केला असून हे सारे बोगस आहे, त्या भानगडीत पडू नका. खगोलातील गोष्टींवर विश्वास ठेवायचाच आहे तर त्यातील वैज्ञानिक आश्चर्यांवर विश्वास ठेवा असा मोलाचा सल्ला खगोलतज्ञ दा. कृ. सोमण यांनी विज्ञानप्रेमींना दिला.

डोंबिवली शिवसेना शहर शाखा आणि साहित्ययात्रा यांच्यावतीने डोंबिवलीत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रविवारी खगोलतज्ञ दा. कृ. सोमण यांनी आकाशातील दहा आश्चर्यांमागचे वैज्ञानिक सत्य याविषयी विज्ञानप्रेमींना मार्गदर्शन केले. पंचांग आणि खगोल अभ्यासाची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल सोमण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, विद्या निकेतन शाळेचे विवेक पंडीत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी वाचनात आलेल्या माहितीवरुन बॉलिवूडमधील सुशांतसिंग राजपूत, शाहरुख खान यांनी चंद्रावर प्लॉट खरेदी केले असल्याचे समजले. 45 ़डॉलरला हा व्यवहार होत असून काहीच हरकत नाही या किंमतीत जमिन खरेदी करण्यास त्यामुळे पुढील नंबर डोंबिवलीकर लावू शकतात अशी कोपरखळी त्यांनी डोंबिवलीकरांना मारली. तसेच एका कविंनी 100 डॉलर खरेदी करत आकाशातील ताऱकाला स्वतःचे नाव दिल्याचे समजले. परंतू हे करणाऱ्या संस्था या बोगस असून केवळ पैसे कमविण्यासाठी हे सारे सुरु आहे. या भानगडीत पडू नका असा सल्ला सोमण यांनी दिला.

आकाशातील चमत्कारांविषयी जाणून घ्यायचेच आहे तर त्यामागचे वैज्ञानिक सत्य जाणून घ्या असे सांगत ते पुढे म्हणाले, अशक्य हा शब्द विज्ञानात नाही आणि जगात चमत्कार नावाची गोष्ट नाही. चमत्कारामागचे विज्ञान समजून घ्यायला पाहिजे. सुखी जीवनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. आश्चर्य वाटेल अशा अनेक घटना आहेत, आकाशगंगा, सुर्यमाला, सूर्य, चंद्र यांच्या निर्मितीविषयी माहिती यावेळी सोमण यांनी दिली. उल्का आणि अशनी यातील फरत त्यांनी समजावून सांगितले. लोणारचे दर्शन अतिशय सोप्या भाषेत सांगून एकदा तरी लोणारला जाऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे आग्रही आवाहन त्यांनी केले.

परग्रहावरील जीवसृष्टीचे देखील प्रत्येकाला कुतूहल असते. अजूनपर्यंत एलियन्स पृथ्वीवर आलेले नाहीत. परंतू इतर सूर्यमालेतील ग्रहांवर जीवसृष्टी असु शकते, अंतर जास्त असल्याने संपर्क साधता येत नसल्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तविली. भविष्यात अवकाश सहल, शून्य गुरुत्वाकर्षणात रहाणे, अवकाशातून पृथ्वीदर्शन, अंतराळ स्थानकात रहाणे आणि हनीमूनसाठी प्रत्यक्ष चंद्रावर जाणे सहज शक्य होईल असेही त्यांनी सांगितले.

माणसे माणसासारखी वागावीत सोमण यांची इच्छा

आपले जीवन अवकाशातील ग्रहांवर नाही तर माणसाच्या मनातील आग्रह, विग्रह, अनुग्रह, पूर्वग्रह आदि ग्रहांवर अवलंबून असते. पुढील शंभर वर्षात आश्चर्यकारक शोध लागतील. संगणक क्षेत्रात अनेक शोध लागून माणसाचे जीवनच बदलणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील शोधांची माहिती त्यांनी दिली. तसेच शास्त्रज्ञांनी असे एक इंजेक्शन शोधून काढावे की ते दिल्यावर माणसे माणसासारखी वागतील अशी इच्छा त्यांनी शेवटी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com