माता-बाल रुग्णालयाला मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

अनेक वर्षांपासून कोपरखैरण्यातील बंद असलेले महापालिकेचे माता-बाल रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

नवी मुंबई - अनेक वर्षांपासून कोपरखैरण्यातील बंद असलेले महापालिकेचे माता-बाल रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी होणारा पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी नवी इमारत खरेदी केली जाईल, असे सांगण्यात आले. तेथील न्युक्‍लिअर हेल्थकेअर लिमिटेड कंपनीची इमारत महापालिका २९ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी करणार आहे. 

कोपरखैरणे येथील महिला व लहान मुलांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या अहिल्यादेवी होळकर माता-बाल रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे माता-बाल रुग्णालय बंद असल्याने गरीब महिलांना तुर्भे अथवा वाशीतील महापालिका रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. वाशीतील रुग्णालयावर वाढता ताण येत असल्याने महापालिकेतर्फे अनेकदा गर्भवतींना नेरूळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात पाठवले जात होते. रुग्णांना कोपरखैरणे ते वाशी व नंतर नेरूळ अशी वणवण करावी लागत असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी कोपरखैरणे येथील माता-बाल रुग्णालय सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. 

माता-बाल रुग्णालयाची जुनी इमारत दुरुस्त करण्यासाठी होणाऱ्या खर्चात नवीन इमारत घेणे शक्‍य होते. त्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देविदास हांडे पाटील याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करत होते. शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांनीही स्थायी समिती सभापती असताना या रुग्णालयाच्या विकासावरून प्रशासनाला धारेवर धरले होते. कोपरखैरणे येथेच माता-बाल रुग्णालय सुरू करण्यासाठी हांडे पाटील यांनी न्युक्‍लिअर हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीची इमारत महापालिकेने खरेदी करावी, असा प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला होता.

कोपरखैरणे येथील महिलांसाठी अनेक वर्षांपासून माता-बाल रुग्णालयाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना वाशी, तुर्भे आणि नेरूळ अशी वणवण करावी लागत होती. महापालिका या रुग्णालयासाठी इमारत खरेदी करणार असल्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे. 
- देविदास हांडे पाटील, नगरसेवक

३६ कोटींचा खर्च 
महापालिकेसमोर आलेल्या प्रस्तावानुसार प्रशासनाने जाहिरात देऊन न्युक्‍लिअर हेल्थकेअर लिमिटेड कंपनीची इमारत २९ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. इमारत खरेदी केल्यानंतर अंतर्गत दुरुस्ती, फर्निचर व नोंदणी शुल्क आदी बाबी समाविष्ट करून एकूण ३६ कोटी २० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या इमारतीमधील चौथा मजला संबंधित कंपनीला रेडीरेकनर दरानुसार पाच वर्षांसाठी भाडेकरारावर देण्यात येईल; परंतु गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या कामकाजात अभ्यास करण्यासाठी सभापती नवीन गवते यांनी या प्रस्तावाला स्थगिती दिली. स्थायी समिती काही दिवसांनी या इमारतीची पाहणी करून प्रस्तावाला मंजुरी देणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother-child hospital in navimumbai