मुंबईत माता मृत्यूचे प्रमाण घटले

नेत्वा धुरी
मंगळवार, 10 जुलै 2018

मुंबई - मुंबई परिसरातील माता मृत्यूच्या दरात चार वर्षांत घट झाल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. मात्र, आजदेखील मुंबई परिसरात महिन्याला माता मृत्यूच्या किमान 20 घटना घडतात. ते कमी करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

मुंबई - मुंबई परिसरातील माता मृत्यूच्या दरात चार वर्षांत घट झाल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. मात्र, आजदेखील मुंबई परिसरात महिन्याला माता मृत्यूच्या किमान 20 घटना घडतात. ते कमी करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

अनेक महिला गर्भधारणा झाल्यानंतर उशिरा नावनोंदणी करतात. त्यामुळे अनेकदा त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्‍टरांना अपयश येते. वेळीच नावनोंदणी केल्यास गर्भवतीला असलेले आजार; तसेच अन्य आवश्‍यक माहिती डॉक्‍टरांना मिळते. त्याचा उपयोग तिच्या आरोग्याबाबत अधिक काळजी घेणे आणि बाळंतपण सुखरूप होण्यासाठी होतो. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने शहरात जनजागृतीवर भर दिला. त्यामुळे चार वर्षांत माता मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हिपॅटायटिस उठतोय मुळावर
2014 ते 2016 या कालावधीत अनेक माता मृत्यू "हिपॅटायटिस'मुळे झाले आहेत. 2014-15 मध्ये 134 माता मृत्यू "हिपॅटायटिस'मुळे झाले. 2015-16 आणि 2016-17 मध्ये हे प्रमाण अनुक्रमे 44 आणि 288 होते. त्याखालोखाल क्षय आणि सेप्सिसमुळे माता मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक होते. 2014 ते 16 या कालावधीत गर्भपाताच्या वेळीही काही महिलांचा मृत्यू झाला. क्षयरोग, सेप्सिस, एक्‍लेम्पिसिया, गर्भवती असताना हायपप्टेन्सिव्ह डिसऑर्डर इत्यादींमुळे होणारे माता मृत्यू रोखण्याचे आव्हान आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतील माता मृत्यू
वर्ष .... झालेले मृत्यू .... दर महिन्याला होणारे माता मृत्यू

2014-15.... 319 ....26
2015-16 ....311....25
2016- 17 ....288.... 24
2017-18 ....240.... 20
एप्रिल ते जून 2018 .... 40.... 12

पालिकेच्या रुग्णालयांत मनुष्यबळाचा अभाव आहे. माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य सेविकांचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. पालिका रुग्णालयांतील सुविधांचे प्रमाणही वाढायला हवे.
- ऍड. प्रकाश देवदास, अध्यक्ष, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना.

Web Title: mother death percentage decrease in mumbai