विस्ताराच्या हालचाली सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक असल्याने शेवटच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेतही खांदेपालट होणार असून, विधान परिषदेचे सदस्य असलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक असल्याने शेवटच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेतही खांदेपालट होणार असून, विधान परिषदेचे सदस्य असलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केल्याने शिवसेनेच्या विधान परिषदेत आमदार असलेल्या ज्येष्ठ मंत्र्यांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. उद्धव ठाकरे यांनी डॉ. सावंत यांचा राजीनामा मंजूर केला, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यावर गंडांतर येण्याची शक्‍यता आहे. 

भाजपसोबतच्या सत्तेत शिवसेनेच्या वाट्याला पाच कॅबिनेट मंत्रिपदे आली आहेत. मात्र, एकनाथ शिंदे वगळता मंत्रिपदावर विधान परिषद सदस्यांची वर्णी लावण्यात आली.  विधानसभा निवडणुकीला अवघे दीड वर्ष शिल्लक असल्याने शिवसेनेत फेरबदलाच्या हालचाली सुरू आहेत. या फेरबदलात सुभाष देसाई, दिवाकर रावतेंसारख्या ज्येष्ठांना पक्ष कार्यासाठी मोकळे करून मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार शिवसेनेकडून होऊ शकतो. रवींद्र वायकर, विजय शिवतारे या राज्यमंत्र्यांना बढती देऊन त्यांच्या जागी आमदाराला संधी दिली जाऊ शकते. सावंत यांचा राजीनामा मान्य झाला, तर शिवसेना मंत्र्यांमधील खांदेपालट अटळ असल्याने शिवसेनेतील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

अधिवेशनाआधी विस्तार?
पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे कृषी, फलोत्पादन खात्याला स्वतंत्र मंत्री नाही. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपूर येथे सुरू होत आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित होणार असल्याने अधिवेशनापूर्वी कृषी खात्यासाठी मंत्री दिला जाऊ शकतो. फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा भरताना आणि शिवसेनेचे नवे मंत्री समाविष्ट करताना मंत्रिमंडळचा विस्तार अथवा फेरबदल होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: The movement of the cabinet expansion started