रात्रीच्या घोळाची चमचमीत गोष्ट... 

सुशील आंबेरकर 
Saturday, 28 December 2019

स्टार - साडेतीन

ज्याच्या-त्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न म्हणजे लग्न. प्रत्येक टप्प्यातील रसभरित वर्णनं सांगितली जातात किंवा चवीचवीने चघळली जातात, पण अखेरच्या टप्प्याचं काय? अर्थात मधुचंद्राबद्दल बोलण्याची किंवा जाहीर वाच्यता करण्याची पद्धत आपल्यात नाही. प्रामुख्याने ग्रामीण भाग लैंगिक शिक्षण आणि वैवाहिक संबंधासारख्या विषयाशी चार हात लांबच आहे. साहजिकच मग आजचे सोशल मीडियात गुरफटलेले तरुण चुकीच्या मार्गाला जाऊन आपल्या "प्रेमाचा जांगडगुत्ता' करून घेतात. अज्ञानाच्या वारूवर स्वार होऊन ते घोडचूक करून बसतात नि मग भरकटलेली वैवाहिक जीवनाची गाडी रुळावर आणताना नाकीनऊ येतात. प्रेम, संयम, संवाद आणि समजूतदारपणाने अशा संकटावर मात करता येते... नितीन सिंधुविजय सुपेकर दिग्दर्शित "आटपाडी नाईटस्‌' चित्रपट हेच सांगतो. लैंगिक समस्येसारखा बंद दाराआडचा संवेदनशील विषय खुसखुशीत भाषेत उलगडून दाखवतो. 

महत्त्वाची बातमी :  'वर्षा'वरील रेघोट्यांवर संजय राऊत याचं उत्तर, म्हणालेत...

 

Image may contain: 7 people, people smiling, people standing

 

सिनेमाची कथा मोठी रंजक आहे. कथेचे खरे मोहरे आहेत वसंतराव खाटमोडे ऊर्फ वश्‍या (प्रणव रावराणे) आणि हरिप्रिया जगदाळे (सायली संजीव). किरकोळ शरीरयष्टीचा वश्‍या लग्नाच्या बोहल्यावर चढलाय. सात-आठ मुलींनी नाकारल्याने तो बावरतो नि ज्योतिषाचा सल्ला घेतो. ज्योतिष त्याच्या लग्नाचं भाकित वर्तवतो, पण "एक प्रॉब्लेम आहे महाराज. तुमच्या रात्रीचा काहीतरी घोळ आहे...' असं सांगून त्याची हवाच काढतो. मित्रांच्या सल्ल्याने शक्तिवर्धक गोळ्यांचा "डोस' घेत वश्‍या लग्नानंतर रात्रीचा गड कसाबसा सर करतो. त्यानंतर काही रात्री रंगत जातात, पण नंतर असं काही घडतं की वश्‍याच्या पौरुषत्वालाच तडा जातो. त्याचं पुढे काय होतं, त्याची पत्नी आणि त्याचं कुटुंबाचं नातं कुठल्या स्तराला जातं, तो लैंगिकतेच्या परीक्षेत पास होतो का इत्यादी प्रश्‍नांच्या उत्तरांबरोबरच एक संदेशही "आटपाडी नाईटस्‌' देतो. 

महत्त्वाची बातमी : UT Is Mean ? वर्षा बंगल्याच्या भींतीवर 'हे' लिहिलं कुणी?
 

Image may contain: 2 people, people smiling, people sitting and outdoor

 

वश्‍याचा रात्रीचा घोळ खुमासदार पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात एक दिग्दर्शक म्हणून सुपेकर यशस्वी झाले आहेत. कला, पटकथा आणि संवादाच्या पातळीवरही त्यांनी चौफेर कामगिरी केल्याने एक संवेदनशील विषय आपण प्रेक्षक म्हणून एन्जॉय करतो. सुपेकरांनी सिनेमाची कथा पुढे सरकवताना वापरलेले बारकावे फारच रंजक आहेत. सुकड्या वश्‍याची तब्येत सुधारावी म्हणून हॉलीवूड स्टार अरनॉल्ड श्‍वार्झेनेगरचा फोटो असलेल्या डब्यात तांदूळ ठेवलेले दिसतात तेव्हाच सिनेमा कशा पद्धतीने लाफ्टर्स काढत जाणार याचा अंदाज येतो. मध्यंतरापर्यंत दिग्दर्शकाने मनोरंजनाची दर्जेदार बरसात करीत नाजूक विषय चवीने हाताळला आहे. म्हणूनच तो कुठेही रटाळ होत नाही की बीभत्स वाटत नाही. वश्‍याचं मित्रांबरोबर "नेत्रसुख' घेणं असो, शक्तिवर्धक गोळ्या मिळवण्यासाठीचे प्रयत्न असोत की भोंदू बाबाची भेट घेणं असो... कुठलाही प्रसंग घसरत नाही. सुपेकरांच्या लेखणीचं अन्‌ व्हिजनसाठी त्यांचं कौतुक करायला हवं. त्यांची पटकथा आणि संवाद सिनेमाच्या रथाची दोन चाकं म्हणता येतील. एकही वंगाळ शब्द न वापरता सुपेकरांनी लिहिलेले वैदर्भीय भाषेतील संवाद अगदीच खुलून आलेत. विशेष म्हणजे सिनेमात हास्याचे डोस पूर्वार्धातच आहेत. उत्तरार्धात मात्र त्याचा असर कमी कमी होत कथा एका गंभीर वळणावर येऊन ठेपते. तरीही पटकथा भरकटलेली नसल्याने एक प्रेक्षक म्हणून आपल्याला न्याय मिळतो. 

महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफी मिळणार पण कंडीशन्स अप्लाय..

 

Image may contain: 2 people, people smiling, people sitting, child and outdoor

 

दिग्दर्शकाने प्रत्येक कलाकाराची निवड अगदी समर्पक केलीय आणि त्यांनीही आपलं काम चोख बजावल्याने सिनेमाने मनोरंजनाचा कमाल दर्जा गाठला आहे. विशेष उल्लेख करावा लागेल तो वश्‍याच्या वडिलांच्या भूमिकेत असलेल्या संयज कुलकर्णी यांचा. वश्‍याला मुलगी दाखवणं, प्रसंगी त्याला प्रोत्साहन देणं, सुनेचा मान राखणं, टीव्हीप्रमाणेच घरातील कुटुंबीयांचाही रिमोट आपल्या हातात ठेवणं आणि शेवटी पत्नीच्या शाब्दिक चपराकीनंतर डोळे उघडणं, असे अभिनयाचे पदर त्यांनी उलगडून दाखवले आहेत. त्यांची देहबोली काबिलेतारीफ आहे. वश्‍या झालेल्या प्रणवचा हिरो म्हणून पहिलाच प्रयत्न देखणा झालाय. त्याचं लाजणं, हसणं, फसणं, प्रेमात पडणं अन्‌ नपुंसकत्वाच्या छायेत कोलमडून जाणं सारंच उत्तम. सायली संजीवने प्रियाची भूमिका समरसून केली आहे. वश्‍याची आई झालेल्या छाया कदम, भाऊ समीर खांडेकर, वहिनी आरती वडगबाळकर आणि तीन मित्र अशा सर्वांनी आपलं काम सुंदर केल्याने सिनेमा एक वेगळीच उंची गाठतो. सिनेमातील "प्रेमाचा जांगडगुत्ता' गाणं आधीच हिट झालंय. नागराज दिवाकर आणि वीरधवल पाटील यांच्या अप्रतिम सिनेमॅटोग्राफीने आटपाडी गाव हुबेहूब उभं केलं आहे. 

महत्त्वाची बातमी  व्वा ! असं काही पाहिलं की खूप भारी वाटतं.. अजिबात चुकवू नका !

Image may contain: 2 people, people smiling, people standing, wedding and flower

 

आजही लैंगिक शिक्षणाबाबत उघडपणे बोललं जातं नाही. ग्रामीण भागात तर अपत्यप्राप्तीसाठी आजही लग्नानंतर लगेच आग्रह धरला जातो, असे काही पदरही सिनेमात आहे. बरोबरीने तो बाप-मुलगा आणि पत्नी-पत्नीच्या नातेसंबधांवरही ताकदीने भाष्य करतो. अभिनेता सुबोध भावे याची प्रस्तुती असलेल्या "आटपाडी...' सिनेमा मनोरंजनाच्या बरोबरीने एक सामाजिक संदेशही आहे. लग्नानंतरच्या प्रेमाची नाजूक गोष्ट एन्जॉय करायची असेल तर "आटपाडी नाईटस्‌' पाहायलाच हवा. 

WebTitle : movie review of atpadi nights by suhil amberkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: movie review of atpadi nights by suhil amberkar