ब्रिटिशकालीन मोगली धरणाच्या झडपा उघडल्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

तुर्भे - दिघा परिसरातील इलठण पाडा येथील रेल्वेचे ब्रिटिशकालीन मोगली धरण भरल्यामुळे त्याच्या तीन झडपा उघडल्या आहेत. त्यामुळे पंढरीनगर, विष्णूनगर, कन्हैयानगर, सुभाषनगर आणि इलठण पाडा परिसरातील झोपडपट्ट्यांना पुराचा धोका निर्माण झाला असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तुर्भे - दिघा परिसरातील इलठण पाडा येथील रेल्वेचे ब्रिटिशकालीन मोगली धरण भरल्यामुळे त्याच्या तीन झडपा उघडल्या आहेत. त्यामुळे पंढरीनगर, विष्णूनगर, कन्हैयानगर, सुभाषनगर आणि इलठण पाडा परिसरातील झोपडपट्ट्यांना पुराचा धोका निर्माण झाला असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रेल्वेच्या मालकीचे मोगली धरण नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी माजी खासदार संजीव गणेश नाईक यांनी केली आहे; परंतु रेल्वेने त्याकडे लक्ष दिलेले नाही. दिघा येथील हे धरण १६० वर्षांपूर्वीचे आहे. या धरणाच्या देखभाल-दुरुस्तीकडे आणि सुरक्षेकडे रेल्वेने दुर्लक्ष केल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळा आल्यानंतर या धरण क्षेत्रातील नागरिक भीतीच्या छायेत वावरतात. काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे धरण भरून वाहत असल्याने रेल्वेने त्याच्या तीन झडपा उघडल्या आहेत. त्यामुळे त्याचे पाणी घरात शिरत असल्याने हजारो झोपडीवासीय हवालदिल झाले आहेत.या धरणाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे त्याच्या भिंतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले असल्याचे सांगून रेल्वेने त्याची दुरुस्ती आणि हस्तांतरणावर पडदा टाकला आहे. पावसाळ्यात धरण परिसरात अनुचित घटना घडू नये म्हणून रबाळे एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांनी तेथे जाण्यास मनाई करणारा व दक्षता घेण्याचा फलक लावून हात झटकले आहेत. तेव्हा येथे सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रेल्वेच्या मालकीच्या धरणाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले आहे. पाऊस सुरू झाल्यापासून धरणाला तडे गेल्याचे संदेश व्हायरला होत आहेत; परंतु या धरणाच्या भिंतीला कोणत्याही प्रकारचे तडे गेलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये.
- सुनील उडसी, मुख्य संपर्क अधिकारी, रेल्वे मुंबई परिमंडळ

‘धरण उशाला, आहे तरी कशाला’ अशी स्थिती या धरणाची झाली आहे. नागरिकांसाठी या धरणाचा वापर व्हावा म्हणून ते महापालिकेकडे हस्तांतरित करा, अशी मागणी रेल्वेकडे केली आहे. पावसामुळे धरण परिसरातील नागरिकांवर पुराचे संकट आहे. रेल्वेने या धरणाची तातडीने डागडुजी करावी.
- नवीन गवते, नगरसेवक

Web Title: Mowgli dam in British day