शरद पवारांना कोण म्हणालं, ‘तुम्ही नशिबवान, तुम्हाला मुलगा नाही’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

'75 वर्षांच्या वडिलांना आपल्या फायद्यासाठी विचार व पक्ष बदलायला लावणारी मुलं असण्यापेक्षा आम्ही मुली बऱ्या. हे वंशाचे दिवे स्वार्थासाठी आपल्या वडिलांना मान झुकवायला लावतात. बरं झालं बाबा तुम्हाला मुलगा नाही,' असे भावनिक उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना उद्देशून काढले आहेत. 

ठाणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून सद्या मोठ्या प्रमाणावर नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत. राजकारणात उतरू पाहणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न प्रत्येक बडा नेता करताना दिसत आहे, याविषयी कोणाचंही दुमत नाही. मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी वर्षानुवर्षे एका विचारधारेत काम केलेले नेते क्षणात भाजपच्या शामियान्यात जात असल्याचं दिसत आहे. हा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वेगळ्या भाषेत समजावून सांगितला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागल्यानं पक्षात चिंतेची बाब आहेच. पण, त्यावरून वडीलांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे थोड्या भावनिक झाल्याचं दिसत आहे. '75 वर्षांच्या वडिलांना आपल्या फायद्यासाठी विचार व पक्ष बदलायला लावणारी मुलं असण्यापेक्षा आम्ही मुली बऱ्या. हे वंशाचे दिवे स्वार्थासाठी आपल्या वडिलांना मान झुकवायला लावतात. बरं झालं बाबा तुम्हाला मुलगा नाही,' असे भावनिक उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना उद्देशून काढले आहेत. 

supriya sule

ठाण्यात राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेनिमित्त सुप्रिया सुळे बोलत होत्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पक्षांतरावर त्यांनी यावेळी वेगळ्या शब्दांत टीका केली. 'कालच मी बाबांशी बोलत होते. तेव्हाच त्यांना म्हणले की, तुम्ही नशीबवान आहात तुम्हाला मुलगा नाही. त्यावर बाबांना प्रश्न पडला की तू असं का म्हणतेस? तर त्यावर मी त्यांना म्हणले की, ही पोरं आपल्या 75 वर्षांच्या वडिलांना त्यांच्या लहान वयाच्या माणसांसमोर झुकायला लावतायत, मग आम्ही मुली परवडल्या. हारलो तरी चालेल पण स्वाभिमानी आहेत. आमच्या वडिलांना दुसऱ्याच्या दारात कधी धुकायला लावणार नाही, कुठलीच मुलगी लावणार नाही. स्वतःच्या करिएरच्या फायद्यासाठी आपल्या वडिलांचे हे हाल करणं बरोबर आहे का? हीच का मराठी संस्कृती...' अशा भावनिक शब्दांत सुळे यांनी मत मांडलं.

पक्षांतर केलेले कुठलेच वडील निवडणूक लढवणार नाहीत. पण मुलं निवडणूक लढवणार आहेत. त्यांना स्वतःवर विश्वास नाही म्हणून त्यांनी वडिलांचेही पक्षांतर केले, असा टोला सुळे यांनी या वेळी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule speaks about Sharad Pawar in Samvad Yatra