Mumbai : मान्सूनकाळातही एमटीएचएलचे काम सुरळीत सुरू राहणार; खबरदारीच्या उपायांसह एमएमआरडीए सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MTHL continue to function smoothly even monsoons MMRDA ready with precautionary measures

Mumbai : मान्सूनकाळातही एमटीएचएलचे काम सुरळीत सुरू राहणार; खबरदारीच्या उपायांसह एमएमआरडीए सज्ज

मुंबई : वादळी वारे आणि मान्सूनच्या काळातही विनाव्यत्यय सुरू राहण्याच्यादृष्टीने एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी,यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला भेट देऊन मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेतला. त्यांनी प्रकल्पाचे सर्व पैलू बारकाईने समजून घेऊन प्रकल्पात काही सुधारणा करता येतील का यावर सर्वसमावेशक अशी चर्चा केली.

मान्सून कालावधीत वातावरणीय बदल, अतिवृष्टी तसेच असमतोल हवामानामुळे समुद्राच्या मध्यभागी कामाच्या प्रगतीचा वेग राखणे कठीण होते म्हणून महानगर आयुक्तांनी कंत्राटदार आणि सल्लागारांना हवामानाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या तसेच त्यानुसार कामाचे नियोजन करून, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याने या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा महत्त्वाचा आहे. मान्सून पुर्व आढाव्यांमुळे पावसाळ्यादरम्यान प्रकल्पाची प्रगती साधताना संभाव्य दुर्घटना तसेच व्यत्यय टाळण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण झाल्या असल्याची खात्री होण्यास मदत होते.

यावेळी आयुक्तांनी, वॉटर प्रूफिंग आणि सरफेसिंग, व्हायाडक्ट पिअर्स, सेगमेंटस् मधली जोडणी आणि पोहोच मार्ग, प्रकल्पाची संरचनात्मक अखंडता आणि अतिवृष्टीसारख्या संभाव्य तसेच भरती-ओहोटी इत्यादींविरूद्ध सुरक्षितता सुनिश्चितकरून करून मान्सून दरम्यान प्रकल्पाची प्रगती अखंड राहावी याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्टतेचे उदाहरण आहे, ज्याने मुंबई शहराला भारताच्या मुख्य भुभागाशी जोडले आहे. प्रकल्प एकूण २२ किमी लांबीचा सागरी पूल आहे ज्याचा १६.५ किमी भाग समुद्रात आहे आणि ५.५ किमी लांबीचा भाग जमिनीवर आहे.

एमटीएचएल प्रकल्पाचा १६.५ किमी भाग सागरी हद्दीत आहे. मान्सून दरम्यान वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा सागरी सेतू पूर्णत्वाच्या अवस्थेत असल्याने, आम्ही खात्री करत आहोत की मान्सूनपूर्व उपाययोजनांची सर्व तयारी पूर्ण केली जाईल. जेणेकरुन कामकाज सुरळीतपणे पार पडेल. पूर्व तयारीची सर्व पाहणी केल्यानंतर, मला खात्री आहे की एमएमआरडीएची टीम कोणत्याही हवामानात कार्यक्षमतेने काम करण्यास तयार आहे.

- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

टॅग्स :Mumbai NewsMonsoonmmrda