बहुप्रतीक्षित इलेक्‍ट्रिक बस तुर्भे डेपोत दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेने (एनएमएमटी) केंद्र सरकारच्या फेम योजनेंतर्गत ३० इलेक्‍ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यातील एक बस रविवारी (ता. १८) परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाली. ऑगस्टअखेरपर्यंत उर्वरित इलेक्‍ट्रिक बस एनएमएमटीकडे येतील, असे सांगितले जात आहे.

नवी मुंबई : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेने (एनएमएमटी) केंद्र सरकारच्या फेम योजनेंतर्गत ३० इलेक्‍ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील एक बस रविवारी (ता. १८) परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाली. ऑगस्टअखेरपर्यंत उर्वरित इलेक्‍ट्रिक बस एनएमएमटीकडे येतील, असे सांगितले जात आहे.

पर्यावरणास पूरक इलेक्‍ट्रिक वाहनांच्या उत्पादनास आणि वापरास प्रोत्साहन मिळावे, याकरिता केंद्र सरकारने इलेक्‍ट्रिक बस खरेदी आणि त्याकरिता लागणारी चार्जिंग सुविधा देण्यासाठी ‘फेम’ योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत एनएमएमटीने ३० इलेक्‍ट्रिक बस आपल्या पदरी पाडून घेतल्या. या बससाठी तुर्भे डेपो आवारात २ चार्जिंग स्टेशन बांधण्यात आली आहेत. दहा-दहाच्या टप्प्याने सर्व इलेक्‍ट्रिक बस परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील. विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी सर्व इलेक्‍ट्रिक बस नवी मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील, असे सांगितले जात आहे. याबाबतच्या प्रस्तावाला परिवहन समितीची मंजुरी  मिळाल्यानंतर निविदेद्वारे मे.जे.बी.एम. सोलारिस इलेक्‍ट्रिक व्हेइकल प्रा.लि. या कंपनीची बस खरेदीसाठी निवड करण्यात आली होती. 

४१ कोटींचा खर्च
इलेक्‍ट्रिक बस व चार्जिंग सुविधेसाठी एकूण ४१ कोटी ४४ लाख ५० हजार खर्च करण्यात आला आहे. एका बससाठी १ कोटी ३३ लाख ५० हजार रुपयांनुसार ३० बसकरता ४० कोटी पाच लाख तसेच; चार्जिंग सुविधेसाठी १३ लाख ९५ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. दिवसाला २२५ किमी धावणाऱ्या या बसची प्रवासी क्षमता ३५ आहे. 

केंद्र सरकारच्या फेम योजनेंतर्गत इलेक्‍ट्रिक बस नवी मुंबई परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या बस पर्यावरणास पूरक असल्याने पर्यावरण संवर्धन, संरक्षणाच्या दृष्टीने शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे. नवी मुंबईच्या नागरिकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्याकडे परिवहन सेवेचा भर आहे. 
- समीर बागवान, सदस्य, परिवहन समिती. 

एक इलेक्‍ट्रिक बस तुर्भे डेपोमध्ये आली आहे. ऑगस्टअखेरपर्यंत उर्वरित बसही लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल होतील. 
- शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, परिवहन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The much-awaited electric bus arrives at Turbhe depot