मुलुंड पूल १५ दिवसांनी खुला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

मध्य रेल्वेमार्गावरील १५ दिवसांत मुलुंडचा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. याअगोदर मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) बांधण्यात आलेल्या पादचारी पुलांपैकी सहा पादचारी पूल सेवेत आले.

मुंबई - मध्य रेल्वेमार्गावरील १५ दिवसांत मुलुंडचा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. याअगोदर मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) बांधण्यात आलेल्या पादचारी पुलांपैकी सहा पादचारी पूल सेवेत आले. त्यामध्ये पश्‍चिम रेल्वेवरील महालक्ष्मी, जोगेश्‍वरी, मालाड, नायगाव, नालासोपारा; तर मध्य रेल्वेवरील टिळकनगर स्थानकाचा समावेश आहे. 

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेनंतर पश्‍चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर ५६ नव्या पादचारी पुलांना मंजुरी देण्यात येत असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. मुलुंडचा पूल आणि प्रवाशांच्या सेवेत आलेले इतर सहा पादचारी पूल वगळता उर्वरित १२ पादचारी पूल सप्टेंबर २०१९ नंतरच सेवेत येणार असल्याची माहिती ‘एमआरव्हीसी’कडून देण्यात आली आहे. 

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या घोषणेनंतरही ‘एमआरव्हीसी’कडून उभारण्यात येणाऱ्या २९ पादचारी पुलांना विलंब झाला आहे. त्यात पश्‍चिम रेल्वेवरील १६ आणि मध्य रेल्वेवरील १३ पुलांचा समावेश आहे. ‘एमआरव्हीसी’मार्फत बांधण्यात आलेल्या पादचारी पुलांपैकी पश्‍चिम रेल्वेवरील पाच व मध्य रेल्वेवरील एक असे सहा पूल सुरू झाले आहेत; तर मुलुंडचा पूलही १५ दिवसांनंतर सेवेत येणार आहे; मात्र उर्वरित २३ पादचारी पूल सप्टेंबर २०१९ दरम्यान प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे ‘एमआरव्हीसी’ने स्पष्ट केले आहे. 

पुलांची उभारणी करण्यासाठी येणारी जागेची अडचण, निविदा काढल्यानंतरही त्याला मिळणारा प्रतिसाद आदी कारणांमुळे पूल उभारणीस विलंब होत आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या पावसाळ्यात रेल्वेची बांधकामे बंद ठेवण्यात येतात. त्यामुळेही पुलांचे काम होणार नसल्याने या कामांना सप्टेंबर २०१९ नंतरच मुहूर्त मिळणार आहे.

प्रस्तावित पादचारी पूल
पश्‍चिम रेल्वे :
मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रॅंट रोड या स्थानकांत दोन, मुंबई सेंट्रल स्थानकात दोन, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, वसई रोड.

मध्य रेल्वे : दादर, कुर्ला, मुलुंड, विक्रोळी, वडाळा, गोवंडी, आंबिवली, आटगाव, टिटवाळा, उल्हासनगर, कसारा, वाशिंद.

Web Title: Mulund bridge open after 15 days