
महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटने 70 कोटींचे 9.97 किलो हेरॉईन जप्त करत एका नायजेरीयन नागरिकाला रविवारी अटक केली आहे.
Heroin Drugs Seized : 70 कोटीची 9.97 किलो हेरॉईन जप्त; 2 नायजेरीयन अटकेत
मुंबई - महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटने 70 कोटींचे 9.97 किलो हेरॉईन जप्त करत एका नायजेरीयन नागरिकाला रविवारी अटक केली आहे. आफ्रिकेतील आदिस अबाबाहून मुंबईला जाणाऱ्या एका प्रवाशाद्वारे अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

या माहितीप्रमाणे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवली होती. संशयित प्रवाशाला 19 मार्च रोजी सकाळी डीआरआय अधिकार्यांच्या पथकाने अडवले आणि प्रवाशाच्या सामानाची कसून झडती घेतली असता त्या प्रवाशाने सामानात लपवून ठेवलेले 9.97 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 70 कोटी रुपये आहे.
प्राथमिक चौकशीदरम्यान, आरोपी प्रवाशाने आणलेले हेरॉईन मुंबईतील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीला देणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार, ड्रग्जची डिलिव्हरी घेणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. डिलिव्हरी घेण्यासाठी हॉटेलमध्ये आलेल्या अजून एका नायजेरियन नागरिकाला पकडण्यात डीआरआयचे अधिकारी यशस्वी झाले. दुसऱ्या अटक नायजेरियन नागरिकाकडून अल्प प्रमाणात कोकेन आणि हिरोईन जप्त करण्यात आले. दोन्ही नायजेरीयन नागरिक आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा सदस्य असल्याचा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे.