
मुंबईतील आम आदमी पार्टी पक्षात मराठी माणसाला डावलण्यात येत असल्याच्या मुद्यावरून यादवी निर्माण झाली असून प्रकरण चांगलेच चिघळले आहे.
AAP Party : पालिका निवडणुकीच्या तोंडावर आपमधील मराठी टक्का दुरावणार?
मुंबई - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ध्येय धोरणे मुंबईत रुजविण्याचे आणि सामान्यांना पक्षाशी जोडण्याचे काम आम आदमी पक्षातील मुंबईतील मराठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते करीत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विरूध्द पक्षश्रेष्ठींनी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे मराठी टक्का आपपासून दुरावण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईतील आम आदमी पार्टी पक्षात मराठी माणसाला डावलण्यात येत असल्याच्या मुद्यावरून यादवी निर्माण झाली असून प्रकरण चांगलेच चिघळले आहे. विकोपाला गेलेल्या या वादात आपच्या मुंबईच्या अध्यक्ष प्रीती मेनन शर्मा यांच्या विरोधात महापालिकेतील कामगार नेते आणि आपचे मुंबईचे प्रवक्ते डॉ. संजय बापेरकर यांनी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तक्रार केली असून आता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कार्याध्यक्ष मनु पिल्लई यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आल्याने त्यांच्यातील वाद चिघऴला आहे. जातीवाचक शिविगाळ, धक्काबुक्की केल्याने आपचे मुंबईचे उपाध्यक्ष रमेश देशमुख, प्रवक्ते ॲड. राकेश राठोड आणि पक्षाचे नेते राजेश सामंत यांनी पक्षातील हुकुमशाही विरोधात भुमिका घेतली आहे. त्यांनी घेतलेल्या भुमिकेला पक्षातील मराठी कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या आठवडाभरापासून पक्षात मराठी अमराठी वाद सुरू झाला असून त्याचे पडसाद आता मुंबईतील विभागा विभागात उमटू लागले आहेत. पक्षातील मराठी नेत्यांना पक्षात चांगली वागणूक मिळत नसल्याने कार्यकर्त्यामध्येही नाराजी निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या आगामी निवडणूकीत उमटण्याची दाट शक्यता आहे. मात्र पक्षश्रेष्ठींनी अजूनही गंभीर दखल घेतली नसल्याने कारकत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.