
Mumbai slum fire : मन होरपळले ,तरी स्वप्न कायम ! पुस्तके जळाली; विद्यार्थ्यांना हवे बळ
गोरेगाव : सोमवारी मालाडच्या आनंदनगरमधील आप्पापाडा परिसरातील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत सुमारे एक हजार झोपड्या खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुपारच्या सुमारास लागलेली भीषण आग अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर रात्री नियंत्रणात आली
असली तरी त्यादरम्यान अनेक संसार उद्ध्वस्त झाले. गंभीर बाब म्हणजे अनेक रहिवाशांच्या महत्त्वाच्या दस्तावेजाची राखरांगोळी झाली असून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वह्या-पुस्तकांबरोबरच हॉल तिकिटेही जळून खाक झाल्याने त्यांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परीक्षा कशी द्यायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
आप्पापाडा परिसरात १० हजार चौरस मीटरवर दोन ते तीन हजार झोपड्या आहेत. ताडपत्री, प्लास्टिक, लाकडी साहित्य, कागद आणि भंगारासारख्या ज्वलनशील वस्तूंमुळे आग वेगाने पसरली आणि त्यात लाखोंचे सामान बेचिराख झाले. सर्वाधिक नुकसान झाले आहे ते दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे. सर्वच जण परिस्थितीपुढे हतबल झाले आहेत.
आमचा अभ्यास जोमाने सुरू आहे; पण आगीत पाठ्यपुस्तकांबरोबरच हॉल तिकीटही जळाल्याने परीक्षा कशी द्यायचा, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. भविष्याचा विचार करून ते अक्षरशः रडकुंडीला आले आहेत.
‘आमची पुस्तके, हॉल तिकीट वगैरे सगळे काही आगीत जळाले. आम्ही परीक्षेसाठी तयार आहोत; परंतु आता आमचे मनोबल खचले आहे. त्यामुळे सरकारने आमच्या परीक्षा १० ते १५ दिवसांनंतर घ्याव्यात,’ अशी विनंती आप्पापाड्यातील विद्यार्थी आणि पालक करीत आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या समस्येकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी विनंती भाकर फाऊंडेशनचे संस्थापक दीपक सोनावणे यांनीही केली आहे.
विविध सामाजिक संस्था मंगळवारी (ता. १४) आप्पापाडा परिसरात पोहोचल्या. रहिवाशांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र दहावी व बारावीच्या परीक्षांचे काय, असा प्रश्नही सर्वांना सतावत आहे. झोपडपट्टी धारकांचा परिसर असल्याने आधीच त्यांची हलाखीची परिस्थिती. त्यात भीषण आगीत त्यांचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले.
सर्वच रहिवासी हातावर पोट भरणारे असंघटित कामगार आहेत. सर्वस्व जळून खाक झाल्याने आता आपली घरे पुन्हा कशी उभारावीत, अशा विवंचनेने त्यांचे रडून बेहाल झाले आहेत. भरपूर शिक्षण घेऊन चांगली नोकरी करण्याचा निर्धार केलेल्या निरागस विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा मात्र आगीमुळे चक्काचूर झाला आहे. मन होरपळले; तरी स्वप्न बहरू दे, असेच त्यांचे म्हणणे असून परीक्षा देण्यासाठी सरकारकडे काही दिवसांची मुदत त्यांनी मागितली आहे.