Andheri Election Result : ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : एकूण १२,७२१ मतदारांनी उमेदवार नाकारले
Andheri Election Result
Andheri Election Result

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण ६५ हजार ६१८ मते मिळाली; तर दुसऱ्या क्रमांकावरील मते ‘नन ऑफ द अबोव्ह’ म्हणजेच ‘नोटा’ला मिळाली.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आवाहनानंतर भाजपने पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. लटके यांच्या विरोधात स्थानिक छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवार होते. त्यामुळे लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता.

एकूण ८५,४६१ (३१.७४ टक्के) मतदारांनी मतदान केले. त्यात लटके यांना ६५,६१८ (७६.७८ टक्के) मते मिळाली. इतर कोणत्याही उमेदवाराला २ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली नाहीत. दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते ही १२,७२१ (१४.८९ टक्के) ‘नोटा’ला पडली. याचा अर्थ खरी लढत ही लटके विरुद्ध ‘नोटा’ अशी झाल्याचे दिसले.

शिवसेनेचे यश कलंकित करण्यासाठी ‘नोटा’चा वापर केला गेला आहे, बाकी काही नाही, अशी प्रतिक्रिया देत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली; तर भाजपने अर्ज मागे घेतल्यानंतरही त्यांच्यातील काहींनी ‘नोटा’ला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांना याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

शिवसेना नेते अनिल परब म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वी पैसे देऊन ‘नोटा’चा प्रचार केला जात होता. कायद्यानुसार ‘नोटा’चा प्रचार करता येत नाही.

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीत उमेदवारांना मिळालेली मते

उमेदवार - मिळालेली मते- टक्के

ऋतुजा लटके - ६६,५३० - ७६.८५

बाला नाडार - १,५०६ - १.७५

मनोज नायक - ८८८ - १.०४

नीना खेडेकर - १,५११ - १.७७

फरहाना सय्यद - १,०८७ - १.२५

मिलिंद कांबळे - ६१४ - ०.७२

राजेश त्रिपाठी - १,५६९ - १.८२

नोटा - १२,७७६ - १४.८०

एकूण मते ८६,१९८ १००

‘नोटा’ हे लोकशाहीचे आयुध आहे. त्याचा भाजपने राजकीय वापर केला. लोकांनी ‘नोटा’चा मोठ्या प्रमाणावर वापर का केला, हे त्यांनाच विचारा.

- ऋतुजा लटके, आमदार

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. आगामी काळातही महाविकास आघाडी व मित्रपक्ष शिंदे-फडणवीस सरकारला पराभवाची धूळ चारतील.

- बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

अखेर विजय सत्याचाच झाला! अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचा प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचा बहुमताने विजय झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांना पुढील यशस्वी राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा!

- अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com