
वांद्रेतील नागरिकांचा मेट्रो स्थानकाच्या कामाला विरोध; स्थानिक आमदार आणि नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ
मुंबईः मेट्रो २ब च्या मार्गातील 'नॅशनल कॉलेज रोड' स्थानक उभारणीच्या आराखड्यात साधू वासवानी उद्यानाचा काही भाग समाविष्ट होतं असल्याने स्थानिकांनी या कामास विरोध दर्शविला आहे. स्थानिक आमदार आशिष शेलार यांनाही ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांची भेट घेतल्याचे नमूद करत उद्यान वाचविले जाईल अशीच भूमिका घेतली आहे. मात्र, स्थानिक आमदार आणि माजी नगरसेवक हे आंदोलनाकडे न फिरकल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
एमएमआरडीएने स्थानक इतरत्र न हलवण्याचा निर्णय घेतल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचे कारण देताना यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होण्याची आणि अडचणी निर्माण होण्याची शक्यता एमएमआरडीएने व्यक्त केली आहे. याच्या निषेधार्थ रहिवाशांनी शनिवारी (ता. २८) रोजी साधू वासवानी उद्यान येथे निषेध आंदोलन केले.
मेट्रो स्टेशनच्या एंट्री/एक्झिट पॉईंट्सच्या बांधकामासाठी एमएमआरडीएने बागेचा काही भाग ताब्यात घेण्याचे ठरविले आहे. याचा नागरिकांनी विरोध केला आहे. रहिवाशांचा आरोप आहे की, यामुळे असंख्य झाडे तोडण्यात येणार आहे. त्यापैकी काही झाडे ही शंभर वर्षे जुनी आणि दुर्मिळ प्रजातींची आहेत. एमएमआरडीएने लोकांना माहिती न देता किंवा स्टेशन हलवण्यापूर्वी सूचना आणि हरकती न मागवता स्थानक स्थलांतरित केले आहे.
माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे म्हणाल्या, "मागील आठवड्यात आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवास यांचीही भेट घेतली आहे. त्यावेळीच त्यांनी अधिकारी याभागात भेट देऊन माहिती घेतील असे सांगितले. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांनी याभागात येऊन पाहणी केली आहे. तसेच, यावेळी आम्ही त्यांना नागरिकांच्या समस्या आणि दुसऱ्या काही जागांचे पर्याय सुचविले आहेत. आमची सुरुवातीपासूनच भूमिका होती आणि आहे की आम्ही स्थानिकांच्या सोबत आहोत. जे योग्य आहे त्यासाठी आमदार आशिष शेलार आणि भाजप नागरिकांच्या सोबत कायमच असणार आहोत."