रस्त्यांवरचे खड्डे आजपासून गायब!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

मुंबई - रस्त्यांतील खड्ड्यांवरून टीकेचे धनी झालेल्या पालिकेची प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्वीकारली आहे. सोमवार (ता. 17) पासून रस्त्यावर खड्डा दिसू नये म्हणून आयुक्तांनी यंत्रणेला कामाला जुंपले आहे. अभियंत्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. खड्ड्यांबाबतची "डेडलाईन‘ आयुक्त पाळणार आहेत. 

मुंबई - रस्त्यांतील खड्ड्यांवरून टीकेचे धनी झालेल्या पालिकेची प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्वीकारली आहे. सोमवार (ता. 17) पासून रस्त्यावर खड्डा दिसू नये म्हणून आयुक्तांनी यंत्रणेला कामाला जुंपले आहे. अभियंत्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. खड्ड्यांबाबतची "डेडलाईन‘ आयुक्त पाळणार आहेत. 

खड्ड्यांचे राजकारण तापले आहे. रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांना खड्ड्यांत उभे केल्यामुळे मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटक झाली होती. अटकेनंतर त्यांनी जामीन घेण्यास नकार दिल्यानंतर प्रशासन हादरून गेले होते. त्यानंतर अभियंत्यांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना कामाला जुंपण्यात आले. अजूनही मुंबईच्या रस्त्यांतील खड्डे बुजलेले नाहीत. शनिवारी (ता. 15) पालिका आयुक्तांनी उपायुक्तांची बैठक घेऊन त्यांना सोमवारपर्यंत सर्वच्या सर्व खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. खड्डे काही बुजता बुजत नाहीत. प्रशासन ठोस उपाययोजना करीत नाही. प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याने आयुक्त मेहता यांच्याविरोधात अविश्‍वासाचा ठराव आणण्याची तयारी भाजपवगळता सर्व पक्षांनी केली. रस्ते चकाचक करा... कामाला लागा, असे सक्त आदेश पालिकेच्या उपायुक्तांना आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविण्यासाठी अभियंत्यांसह पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. अभियंत्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी रस्त्यांवर सर्व यंत्रणा सक्रिय राहणार आहेत. 
 

100 रस्त्यांची कामे आजपासून सुरू 
खड्ड्यांचा गोंधळात गोंधळ सुरू असताना पालिकेने नव्या 100 रस्त्यांची कामे सोमवार (ता. 17) पासून हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी 500 रस्त्यांची कामे महिनाअखेर सुरू करण्यात येणार आहेत. रस्त्यांच्या कामाबाबत वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवून कालबद्ध कृती आराखडा तयार करण्यात येईल. आराखड्यानुसार नियोजित वेळेत रस्त्यांची कामे पूर्ण होतील, याची काळजी घेण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. 
 

...तर हमी कालावधीतील कामे पालिका करील 
हमी कालावधीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे संबंधित कंत्राटदाराने केली नाहीत किंवा टाळाटाळ केल्यास पालिका ती करील; परंतु त्याचा खर्च संबंधित कंत्राटदाराच्या देयकातून वसूल केला जाईल. तसेच त्या कंत्राटदारावर कारवाईही केली जाईल. तसे आदेश पालिका आयुक्तांनी उपायुक्तांना दिले आहेत. 

Web Title: Mumbai to be pothole-free within next few days