मुख्य सूत्रधाराविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल

Mumbai-Bomb-Blast
Mumbai-Bomb-Blast

मुंबई - मुंबईतील 1993 च्या साखळी बॉंबस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी अहमद कमाल शेख याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) विशेष टाडा न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या कटाचा मुख्य सूत्रधार दाउद इब्राहीमसोबत बैठकींना उपस्थिती आणि मुंबईतील विध्वंसाचा आराखडा शेखच्या उपस्थितीत तयार झाल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

1993 मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीच्या सुरवातीला या बैठका दुबईत झाल्या होत्या. शेख ऊर्फ अहमद लांबू ऊर्फ खालीद कमाल शेख 1993 पासून फरारी होता. एक जून 2018 ला त्याच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या होत्या. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. 25 वर्षांपूर्वी 12 मार्चला मुंबईत झालेल्या साखळी बॉंबस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला; तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते. राज्य सरकारच्या विनंतीवरून 19 नोव्हेंबर 1993 ला सीबीआयने या तपासाची सूत्रे हातात घेतली होती. 17 सप्टेंबर 1993 ला शेखविरोधात अजामीनपात्र वॉरंट तर त्यानंतर इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही बजावली होती.

सीबीआयचे दावे
स्फोट घडवण्यासाठी शस्त्र हाताळण्याचे आणि स्फोटकांचे प्रशिक्षणही शेखने घेतले होते. मुंबईत छात्रावासात (डॉरमॅटरी) राहत असलेल्या शेखने स्फोटानंतर लगेचच मुंबई सोडली होती. मोहम्मद डोसाने त्याची ओळख दाउदशी करून दिली होती. याशिवाय, रायगडात आरडीएक्‍स उतरवण्यातही शेख सामील होता. स्फोटाचा कट रचताना शेख सक्रिय होता; तसेच या स्फोटाचे परिणाम काय होऊ शकतात, याची पूर्ण कल्पना शेखला होती, असा दावा सीबीआयने पुरवणी आरोपपत्रात केल्याची माहिती सीबीआयचे प्रवक्ते अभिषेक दयाल यांनी मंगळवारी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com