अन् महापालिकेच्या तिजोरीची लूट, भाजपकडून शिवसेनेवर हल्लाबोल

पूजा विचारे
Saturday, 30 January 2021

आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबई माहपालिकेने विकासक, कंत्राटदार, जाहिरातदारांना सूट देऊन अंदाजित उत्पन्नाच्या केवळ २५ उत्पन्न मिळवल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलंय.

मुंबईः भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत मुंबईतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. या निर्णयाची आता अंमलबजावणी करण्यात आली आहे. दरम्यान आता मालमत्ता कराअंतर्गत येणाऱ्या १० करांपैकी केवळ सर्वसाधारण कर माफ केला जाणार आहे. इतर ९ कर मात्र भरावे लागणार आहे. यावरुनच आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबई माहपालिकेने विकासक, कंत्राटदार, जाहिरातदारांना सूट देऊन अंदाजित उत्पन्नाच्या केवळ २५ उत्पन्न मिळवल्याचे आशिष शेलार  यांनी म्हटलंय.

महापालिकेच्या तिजोरीची लूट करून सत्ताधीशांच्या धनदांडग्यावर सवलतीचा पाऊस केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, मुंबई महापालिकेच्या 2020-21च्या अर्थसंकल्पाची सद्यस्थिती अत्यंत गंभीर.. 1 एप्रिल 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत अंदाजित उत्पन्नाच्या केवळ 25% उत्पन्न जमा! वा, रे वा सत्ताधारी… श्रीमंत पालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणली. हीच का ती तुमची, करुन दाखवलेली कामगिरी!!,”

बिल्डरांना प्रीमियममध्ये 50% सूट, कंत्राटदारांना सुरक्षा/ अनामत रक्कम, कामगिरी हमीत सूट, जाहिरातदारांना अनुज्ञापन शुल्कात 50% सूट, हॉटेल मालकांना मालमत्ता करात तिमाहीसाठी 100% सूट…ताजला सूट… सत्ताधीशांचा धनदांडग्यांवर सवलतीचा पाऊस अन् महापालिकेच्या तिजोरीची लूट! सामान्य मुंबईकरांना 2015 ते 2020 पर्यंत मालमत्ता करातून वगळण्यात आले. मात्र आता सर्व 500 चौ. फु.पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घर मालकांना मालमत्ता कराच्या दहापैकी नऊ कर हे थकबाकीसह भरावे लागणार! मदत म्हणून काही दिले तर नाहीच, उलट सामान्य मुंबईकरांच्या पाकीटमारीचा कार्यक्रम सुरु,” असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai bombay municipal corporation Ashish shelar criticizes shivsena twitter