
दोन अनोळखी व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याची तक्रार शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मंगळवारी दादर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
Mumbai News : शीतल म्हात्रेंचा पाठलाग केल्याप्रकरणी दोघांवर दादर पोलिसात गुन्ह्याची नोंद; आरोपींचा शोध सुरू
मुंबई - दोन अनोळखी व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याची तक्रार शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मंगळवारी दादर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. दादर पोलिसांनी याची तातडीनं दखल घेत दोन अनोळखी व्यक्तींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली आहे.
शीतल म्हात्रे सोमवारी त्यांच्या मातोश्रींची भेट घेण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आल्या होत्या. आईला भेटून दुपारी 3 ते 3.30 च्या दरम्यान बाळासाहेब भवन, चर्चगेटला जाण्यासाठी शीतल म्हात्रे निघाल्या. यावेळी बाईकवरुन दोन जण आपला पाठलाग करत असल्याचं म्हात्रे यांना निदर्शनास आलं. त्यांच्या सोबत चालक विशाल जाधव तसेच सुरक्षेसाठी नेमणूकीस असलेले पोलीस महाले हे देखील वाहनात होते.
शीतल म्हात्रेनी वाहनाच्या डाव्या बाजूला सीटवर बसले होते. त्यांची चारचाकी शिवाजी पार्क येथून वीर सावरकर मार्गाने मुंबईच्या दिशेने पुढे जात होती. पुढे दुमी जंक्शन येथून किर्ती कॉलेज जंक्शन या ठिकाणी येत असतांना आमच्या वाहनांचा दुचाकीवरून दोन जण पाठलाग करत असल्याचे निदर्शनास आल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
दुचाकीवरील व्यक्ती शीतल म्हात्रे यांच्याकारजवळ येऊन त्यांच्याकडे वारंवार टक लावून बघत असल्याचं त्यांनी पाहिलं. तसंच सदर स्कुटरवरील दोन इसमांपैकी मागे बसलेला इसम त्यांच्याकडे दिशेनं हातवारे करत होता. दोन्ही इसम हल्ला करण्याची भिती वाटल्याने वाहन चालकास गाडीचा वेग वाढविण्यास शीतल म्हात्रेनी सांगितले.
अखेर शीतल म्हात्रेनी या संदर्भात दादर पोलिसात तक्रार दाखल केली होती.दादर पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (डी), 352 आणि 34 अन्वये 2 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दादर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.