आगार व्यवस्थापकांनी टोचले एसटीचे कान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

एसटी महामंडळाच्या मुख्यालयाला लागून असलेल्या मुंबई सेंट्रल बसस्थानकाची पार दुरवस्था झाली आहे.

मुंबई - एसटी महामंडळाच्या मुख्यालयाला लागून असलेल्या मुंबई सेंट्रल बसस्थानकाची पार दुरवस्था झाली आहे. त्याबाबतची सचित्र बातमी ‘सकाळ’मध्ये ३ मे रोजी प्रकाशित झाली होती. तिची दखल घेत आगार व्यवस्थापकांनी एसटीच्या बांधकाम विभागाला बसस्थानकाची दुरुस्ती करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर आता दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. बंद असलेल्या शौचालयाची दुरुस्ती तत्काळ करून घेत प्रवाशांना सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

मुंबई सेंट्रल बसस्थानकावरील इमारतीला ५५ वर्षे पूर्ण झाली. जीर्ण झालेल्या इमारतीच्या एका भागाची डागडुजी केली जात आहे. दुसऱ्या भागाचे प्लास्टर पडायला आले आहे. स्थानकावरच असलेले सुलभ शौचालय तुंबल्याने दुर्गंधीयुक्त वास येत असल्याचे वास्तव ‘सकाळ’ने उघड केले होते. त्यानंतर आगार व्यवस्थापकांनी बातमीची दखल घेत, एसटीच्या बांधकाम विभागाला स्थानकावर सुधारणा करण्याबाबत पत्र लिहिले. त्यानंतर बंद असलेल्या सुलभ शौचालयालासुद्धा ५०० रुपयांचा दंड करण्यात आला असून, तत्काळ सुधारणा करून शौचालय प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. स्थानकातील खुर्च्या दुरुस्त करण्याचाही पत्रात उल्लेख आहे. स्थानकातील डागडुजी संपताच प्रवाशांच्या सोईच्या दृष्टीने सुविधा पुरवल्या जाणार असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एकही आगार सुस्थितीत नाही! 
नुकतेच एसटीचे संचालक रणजीतसिंह देओल यांनी राज्यातील आगारांचा आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या गोपनीय अहवालात आगाराचे श्रेणीकरण केले होते. त्यामध्ये राज्यातील एकही आगार उत्कृष्ट नसल्याची नोंद करत, चक्क मुख्यालयाला लागूनच असलेल्या मुंबई सेंट्रल बसस्थानकाचीही निकृष्ट श्रेणीत नोंद करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील बसस्थानकांच्या स्वच्छतेत सुधारणा होणार तरी कधी? असा प्रश्‍न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title: Mumbai Central Bus Stand is in bad condition