मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाची ऐशीतैशी

सुशांत मोरे
शनिवार, 3 जून 2017

वर्षभरात 56,899 लोकल फेऱ्यांचा वक्‍तशीरपणा बिघडला

वर्षभरात 56,899 लोकल फेऱ्यांचा वक्‍तशीरपणा बिघडला
मुंबई - मध्य रेल्वे आणि वक्तशीरपणा यांचे कधी जुळलेच नाही. विविध कारणांनी लोकल फेऱ्यांना होणारा उशीर आणि प्रवाशांना होणारा मनस्ताप महिन्यातून बऱ्याचदा अनुभवण्यास मिळतो. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कितीही आश्‍वासने दिली तरीही 2016/17 मधील आकडे काही वेगळेच सांगत आहेत. या काळातील मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा आढावा घेतला तर तब्बल 56 हजार 899 लोकल फेऱ्यांचा वक्‍तशीरपणा चांगलाच बिघडला आहे. सर्वाधिक फटका हा रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी कामांबरोबरच रेल्वे फाटके आणि मुंबईत प्रवेश करणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सिग्नलमधील बिघाडांमुळे बसत असल्याचे समोर आले आहे.

मध्य रेल्वेच्या मेनलाईन आणि हार्बरवर 121 लोकलच्या दररोज 1600 लोकल फेऱ्या होतात. या फेऱ्यांमधून दिवसाला 40 लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात; मात्र हा प्रवास करताना अनेकदा लोकल फेऱ्या विविध कारणांनी कधी पाच मिनिटे, तर कधी दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतात. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

रेल्वेकडून विविध कामांसाठी घेण्यात येणाऱ्या नियोजित मेगाब्लॉकबरोबरच काही वेळेला घेतले जाणारे छोटे-छोटे ब्लॉक, काही ठिकाणी असणारी वेगमर्यादा अशा अभियांत्रिकी कामांमुळे लोकल फेऱ्यांना तर मोठा फटकाच बसतो आहे. 2016/17 मध्ये 22 हजार 410 लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडले. 2015/16 मध्ये 21 हजार 508 फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडले होते.

लोकल फेऱ्या बंद करून किंवा रात्रीच्या वेळी अभियांत्रिकी कामे होऊ शकत नाहीत. सकाळच्या वेळेतच अभियांत्रिकी कामे झटपट उरकता येतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापाठोपाठ मध्य रेल्वे, मेनलाईन आणि हार्बर मार्गावर असणाऱ्या रेल्वे फाटकांमुळेही वेळापत्रकावर मोठा परिणाम होतो. मेनलाईनवर कळवा, दिवा, ठाकुर्लीबरोबरच कुर्ला, चुनाभट्टी येथे रेल्वेची फाटके आहेत. ही फाटके नेहमी दोन-तीन मिनिटे उघडतात आणि बंद होतात. त्याचबरोबर कधीकधी तांत्रिक समस्यांमुळे ही फाटके पाच ते सात मिनिटेही उघडी राहतात. त्यामुळे लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागतो. वर्षभरात 13 हजार 520 लोकल फेऱ्यांना फाटकांमुळे लेटमार्क लागला आहे. लोकलमधील आपत्कालीन चैन खेचणे, सिग्नल व ओव्हरहेड वायरमधील बिघाड, लोकलमधील बिघाड व रूळ ओलांडताना प्रवाशांच्या होणाऱ्या अपघातांमुळेही लोकल फेऱ्या मोठ्या प्रमाणात विस्कळित झाल्याची नोंद मध्य रेल्वेकडे आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांची डोकेदुखी
मध्य रेल्वेवरील काही मेल, एक्‍स्प्रेस गाड्यांमुळेही लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक चांगलेच बिघडते. मुंबईत येताच किंवा मुंबईतून जाताना प्रथम मेल, एक्‍स्प्रेस गाड्यांना जाण्यासाठी प्राधान्य दिले जाते व लोकल फेऱ्यांना मागे ठेवले जाते. यात बहुतांश वेळी जलद लोकल फेऱ्यांचा समावेश असतो. काही वेळेला तर एखाद्या एक्‍स्प्रेसमध्ये बिघाड झाल्यासही अन्य लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. 2016/17 मध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे तब्बल चार हजार 712 फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडले आहे.

2016/17 मधील अन्य तांत्रिक बिघाड आणि फेऱ्यांवर झालेला परिणाम
बिघाडाचे कारण फेऱ्यांवर झालेला परिणाम
सिग्नलमधील बिघाड 5791 लोकल फेऱ्या
लोकलमधील चैन खेचणे 3119 लोकल फेऱ्या
ओव्हरहेड वायरमधील बिघाड 2872 लोकल फेऱ्या
लोकलमधील बिघाड 2750 लोकल फेऱ्या
रूळ ओलांडताना अपघात 1725 लोकल फेऱ्या

Web Title: mumbai central railway time table