मुंबईकर शेतकऱ्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 जुलै 2017

मुंबईत 694 तर उपनगरात 119 शेतकरी; आकडेवारीत वर्ध्याचे नावच नाही

मुंबईत 694 तर उपनगरात 119 शेतकरी; आकडेवारीत वर्ध्याचे नावच नाही
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या 36 लाख 10 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी जाहीर करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, या यादीत मुंबई व मुंबई उपनगरातील शेतकऱ्यांची देखील नोंद असल्याने सरकारची पंचाईत झाली आहे. तर, आत्महत्याग्रस्त वर्धा जिल्ह्यात एकाही शेतकऱ्यांकडे कर्ज नसल्याची धक्‍कादायक माहितीही समोर आली आहे. मुख्यमंत्री व प्रशासनाच्या अतिघाईने कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या या सरकारी आकडेवारीवरच आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, मुंबईतले शेतकरी कोण असा प्रश्‍न विचारला जात आहे.

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पंढरपुरला विठ्ठलाची शासकीय पूजा करण्यासाठी रात्री निघाले. त्या अगोदर त्यांनी साडे अकरा वाजता ट्‌वीट करून राज्यातल्या 35 जिल्ह्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी प्रसिध्द केली. दिड लाखापर्यंत कर्ज असलेल्या या शेतकऱ्यांमधे मुंबईतले 694 तर उपनगरातले 119 शेतकऱ्यांचा देखील समावेश असल्याची नोंद या यादीमधे होती. तर, वर्धा या जिल्ह्याचा उल्लेखच यादीत नाही. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली यादीच आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

मुंबईतल्या शेतकऱ्यांबाबत स्वत: मुख्यमंत्री अनभिज्ञ असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. तर बॅंकाकडून आलेली आकडेवारी तपासून चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर व बॅंकावर कारवाईचा इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.

दरम्यान, सरकारच्या या आकडेवारीवरून मुंबईतल्या शेतकऱ्यांची नावे शोधण्यासाठी राज्यस्तरीय बॅंकींग समितीकडे विचारणा केली असता सरकारने मागितलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी दिल्याचे उत्तर देण्यात आले. यामध्ये सुधारणा होऊ शकते असा दावाही या समितीतल्या सूत्रांनी केला. मात्र, कर्जमाफीच्या निकषानुसार सरकारने आकडेवारी मागितली असताना त्यामध्ये छाननी करण्यात काही तांत्रिक चुका असू शकतात अशी कबुली देखील बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शेतीपूरक कर्ज?
मुंबईतल्या काही राष्ट्रीयकृत बॅंका सोने तारण ठेवून प्रायॉरिटी सेक्‍टर फंडिग करतात. यामध्ये शेतीपूरक व काही शेती यंत्राच्या कर्जाचा समावेश असू शकतो. त्यामुळे मुंबईत देखील शेतीकर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा आकडा आलेला असावा असा दावा काही बॅंकिग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी केला आहे.

Web Title: mumbai chief minister problem by mumbai farmer