वाढीव वीज बिलाचा शाॅक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

कांदिवली, मालाड व गोराईमधील अदानी इलेक्‍ट्रिक कंपनीच्या ग्राहकांना १० ते १५ पटीने वाढीव वीज बिल आल्याने चांगलाच शॉक बसला आहे.

मुंबई : कांदिवली, मालाड व गोराईमधील अदानी इलेक्‍ट्रिक कंपनीच्या ग्राहकांना १० ते १५ पटीने वाढीव वीज बिल आल्याने चांगलाच शॉक बसला आहे. याबाबत अदानी कार्यालयात तक्रार केली असता आधी बिल भरा त्यानंतर उपाययोजना करू, असे उत्तर देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. जवळपास ४०० ते ५०० नागरिकांना १० ते २० हजारांपर्यंत वीज बिल आले आहे. 

याबाबत कांदिवली महावीरनगर येथील वीणा सितार, रत्नाकर आणि महावीर दर्शन संस्थेतील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते विपुल वोरा, केतन शाह यांच्याकडे धाव घेतली. वोरा यांनी त्वरित नागरिकांसह स्थानिक नगरसेविका प्रतिभा गिरकर यांची भेट घेतली. रहिवासी विजय गुजराती यांना नेहमी हजार, बाराशेपर्यंत बिल येते. या वेळी त्यांना ११ हजार ६८० रुपये; तर हेमेंद्र शाह यांनादेखील १९ हजार ७७० रुपये बिल आल्याचे या वेळी सांगण्यात आले. अशाप्रकारे जवळपास २३० नागरिकांनी आपले वाढीव बिल गिरकर यांच्या कार्यालयात जमा केले. गिरकर यांनी त्वरित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तक्रार घेता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर गिरकर यांनी तसे लेखी लिहून द्या, मी माझ्या पद्धतीने कारवाई करते असे ठणकावले.

आंदोलनाचा इशारा
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नगरसेविका गिरगाव यांच्या कार्यालयात चर्चा केली. या वेळी अधिकाऱ्यांनी मीटर रीडिंग अहवाल दाखवून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; मात्र जोपर्यंत तक्रारींचे निवारण होऊन नागरिकांना नियमित बिल येत नाही, तोपर्यंत कोणाचीही वीज कापता कामा नये, असे गिरकर यांनी स्पष्ट केले; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा चर्चेत उपस्थित आमदार विजय गिरकर यांनी दिला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai citizens gets Increased electricity bill