मुंबई शहर जिल्ह्याच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जानेवारी 2017

विकासकामांसाठी 108 कोटी 63 लाख रुपयांची तरतूद

विकासकामांसाठी 108 कोटी 63 लाख रुपयांची तरतूद
मुंबई - मुंबई शहर जिल्ह्यातील झोपडपट्टीच्या प्रश्नासह विविध समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन कामाला सुरवात केली जाईल. विविध विकासकामांची आवश्‍यकता लक्षात घेता जिल्हा नियोजन विकास समितीने 2017-18 या आर्थिक वर्षासाठी 108 कोटी 63 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.

जिल्हा नियोजन समितीची बैठक ग्रॅंट मेडिकल कॉलेजच्या इमारतीत झाली. त्या वेळी ते बोलत होते. महापौर स्नेहल अंबेकर, आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, आर. तमिल सेल्वन, अमिन पटेल, राहुल नार्वेकर, वर्षा गायकवाड, किरण पावसकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, एमएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी यूपीएस मदान, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने, दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मानसिंग पवार, तसेच नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत मुंबई शहर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण योजनेकरिता 88 कोटी 29 लाख, अनुसूचित जातींच्या योजनांसाठी 18 कोटी 76 लाख रुपये, अदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना - एक कोटी 58 लाख इतक्‍या निधीच्या जिल्हा विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. देसाई म्हणाले, की झोपडपट्टीच्या प्रश्नाबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन लवकरच कामाला सुरवात केली जाईल. अनधिकृत धार्मिक स्थळे डिसेंबरअखेरपर्यंत हटविण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. यापैकी अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. महत्त्वाच्या विषयांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविले जातील.

Web Title: Mumbai City District approved the draft design