Mumbai : विमानतळावर महिलेचा गोंधळ! अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी बॅगेत बॉम्ब असल्याची पसरवली अफवा | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Mumbai Airport

Mumbai : विमानतळावर महिलेचा गोंधळ! अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी बॅगेत बॉम्ब असल्याची पसरवली अफवा

मुंबई : बॅगमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे साहित्य असल्यामुळे अतिरिक्त शुल्क भरावे लागू नये म्हणून विमानतळावर गोंधळ घालणाऱ्या महिलेला सहार पोलिसांनी अटक केली आहे. आपल्याकडे बॉम्ब असल्याचा बनाव करून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ घातल्याचा महिलेवर आरोप करण्यात आला आहे. रुचा शर्मा असे महिला प्रवाशाचे नाव आहे.

महिला सोमवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्पाईस जेटच्या विमानाने कोलकात्याला जात होती. अतिरिक्त सीमा शुल्क भरावे लागू नयेत यासाठी महिलेने बनाव केल्याचे चौकशीत समोर आले आहे. आरोपी महिलेला न्यायालयापुढे हजर केले असता तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत

मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर रूचा शर्मा चेक इन काउंटरवर आल्या. त्यांच्याकडे 2 बॅगा होत्या. ज्याचे वजन 22 किलो होते. देशांतर्गत विमान प्रवासासाठी 15 किलो वजनाची मर्यादा असल्यामुळे अतिरिक्त वजनासाठी शर्मा यांना शुल्क भरावे लागल्याचे सांगण्यात आले.

रुचा शर्मा यांनी शुल्क भरण्यास नकार देत स्पाईस जेटच्या महिला कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी शर्मा यांनी कर्मचाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणीही केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सीआयएसएफचे अधिकारी मुथु कुमार यांना बोलावून घेतले.

बॅगेत बॉम्ब

मुथु कुमार यांनी आपण सीआयएसएफमध्ये असल्याचे सांगितल्यानंतर रूचा शर्माने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुथु कुमार यांनी श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यानंतर बॅग उघडून तपासली असता त्यात काहीच सापडले नाही.

या प्रकरणामुळे विमानतळावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर तेथे सहार पोलीसांचे पथक दाखल झाले. सहार पोलिसांनी रूचा शर्मा यांना अटक केली. याप्रकरणी शर्मा यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली.

टॅग्स :Mumbai NewsCrime News