काँग्रेसचा नेता विचारतोय, मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली?

पूजा विचारे
Thursday, 16 July 2020

माजी खासदार संजय निरुपम यांचीही पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत जोरदार चर्चाही सध्या सुरु झाल्या आहेत. अशा चर्चा रंगू लागल्यानंतर संजय निरुपम यांनी सवाल उपस्थित केला आहे. 

मुंबईः  राजस्थानमधील कॉंग्रेसचे युवा नेते सचिन पायलट पक्षाने त्यांना सर्व पदांवरुन काढून टाकलं. त्यानंतर कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारणात चांगलाच गोंधळ झाला आहे. त्यामुळे आता पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय काँग्रेस पक्षानं घेतला आहे. त्यामुळे आता  माजी खासदार संजय निरुपम यांचीही पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत जोरदार चर्चाही सध्या सुरु झाल्या आहेत. अशा चर्चा रंगू लागल्यानंतर संजय निरुपम यांनी सवाल उपस्थित केला आहे. 

मी फक्त शिवसेनेवर टीका केली. त्याचा पक्षविरोधी कारवाईशी संबंध काय?, अशी विचारणा करत मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली आहे का? असा संतप्त सवाल निरुपम यांनी उपस्थित केला आहे. संजय निरुपम यांनी ट्विट करून त्यांच्यावर होणाऱ्या संभाव्य कारवाईवर परखड मत व्यक्त केलं आहे.

मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी हायकमांडकडे केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांशी संबंधित भूखंड घोटाळ्याच्या चौकशीची मी मागणी केली आहे. त्यामुळे माझ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. शिवसेनेविरोधात बोलणं ही पक्षविरोधी कारवाई होऊ शकते का? मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली आहे का?, असे प्रश्न निरुपम यांनी ट्विट करुन उपस्थित केलेत.

हेही वाचाः ठाण्यात बेड्सची कमतरता, तर कल्याण डोंबिवली कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

राजस्थानचे पडसाद महाराष्ट्रात

कॉंग्रेसनं पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष आता अशा नेत्यांना थेट घरचा रस्ता दाखवणार आहे. त्यात काँग्रेसचे नेते संजय झा यांनी उघडपणे सचिन पायलट यांची बाजू घेतली. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता  माजी खासदार संजय निरुपम यांचीही पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी हायकमांडकडे याबाबत रिपोर्ट सादर करुन संजय निरुपम यांची हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंगाच्या आरोप ठेवण्यात आला आहे. 

अधिक वाचाः प्रशासकीय अधिकारी ते साहित्यिक; नीला सत्यनारायण यांचा असा होता जीवनपट

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले की, सचिन पायलट यांच्या प्रकरणानंतर आता ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाची शिस्तभंग करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. तसेच पक्षाला मारक ट्विट करणारे काही नेतेही एआयसीसीच्या रडारवर आहेत.

संजय निरुपम यांनी गेल्या काही महिन्यांपासून पक्षविरोधी वक्तव्य करत पक्षालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेस सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीवरही त्यांनी सातत्यानं टीका केलीय. आताच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याजवळील मालमत्ता खरेदीची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर शिवसेनेने महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत तीव्र निषेध नोंदविला होता. 

गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान निरुपम यांनी थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच आव्हान दिलं होतं.  ते म्हणाले होते की, कॉंग्रेसमध्ये दोन गट आहेत, त्यातील एक सोनिया गांधी आणि दुसरे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आहेत. सोनियाचे राजकीय सल्लागार अहमद पटेल  यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला होता.

Mumbai Congress merged into Shivsena Sanjay Nirupam asked tweet


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Congress merged into Shivsena Sanjay Nirupam asked tweet