15 वर्षांपासून फरार आरोपी गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accused Arrested

Mumbai Crime : 15 वर्षांपासून फरार आरोपी गजाआड

मुंबई - घरफोडीच्या गुन्ह्यात 15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यास रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या हातावरील टॅटूवरून आरोपीला पोलिसांनी अटक केली. 63 वर्षीय आरमुगम पल्लास्वामी देवेंद्र असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस अधिक तपास करत आहेत.मुंबईतील भांडुप, अँटॉप हिल, सायन तसेच गुजरात येथील पोखारा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्ह्यांची नोंद आहे.

मुंबईतील न्यायालयाने आरोपीला फरार घोषित केले होते.आरोपीचा फोटो पोलीस रेकॉर्डवर नव्हता. तसेच आरोपी वारंवार पत्ते बदलून कल्याण, माहीम, भांडुप तसेच कामाच्या ठिकाणी कोठेही राहण्यास असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्यास पोलीस पथकाला अडचणी निर्माण होत होत्या.यादरम्यान, त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर 'बदाम व क्रॉस' या गोंदणांची नोंद आढळून आली. तोच धागा पकडून पथकाने तपास सुरू केला. खात्याअंतर्गत विविध अॅपवर समान नावाचे वेगवेगळे आरोपी दर्शवत होते. खबऱ्याकडून आरोपीचा मोबाइल क्रमांक मिळवून विविध बँकांशी त्यावरून पत्रव्यवहार करून त्याचा फोटो मिळविला. आरोपीने ते बँक खातेदेखील वापरणे बंद केले होते.

अशी केली अटक...

आरोपी आरमुगम पल्लास्वामी देवेंद्र वेगवेगळ्या प्रेक्षणीयस्थळी वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यातूनच तो 'मुंबई दर्शन' मार्गावर चालक म्हणून काम करत असल्याच्या शक्यतेतून शोध सुरू केला. अखेर फोर्टस्थित ट्रॅव्हल एजन्सीला त्याची ओळख पटली. मुंबई दर्शनाचा प्लॅन असल्याचे सांगून देवेंद्रला बोलावून घेतले. आरोपी जाळ्यात अडकताच त्याच्यावर कारवाई केली. आरोपी 'मुदलीयार' असा नावात बदल करून वावरत होता.