
आयआयटी मुंबई शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या कथित आत्महत्या प्रकरणात पुढील तपासासाठी मुंबई पोलीसांचे पथक अहमदाबादेत पोहोचले आहे.
Mumbai Crime : आयआयटी विद्यार्थी आत्महत्या प्रकरण: पोलिसांचे पथक अहमदाबादेत दाखल
मुंबई - आयआयटी मुंबई शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या कथित आत्महत्या प्रकरणात पुढील तपासासाठी मुंबई पोलीसांचे पथक अहमदाबादेत पोहोचले आहे. दर्शन सोळंकी यांच्या अहमदाबाद येथील निवासस्थानी पवई पोलिसांच्या 3 अधिकाऱ्यांचे पथक गुरूवारी दर्शन सोळंकीच्या घरी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी दर्शन सोळंकीचे वडील आणि इतर कुटुंबीयांची भेट घेतली. दर्शनच्या बहिणीने नुकतेच या प्रकरणात जातीय भेदभाव असल्याचा दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणी पवई पोलिस आणखी एकदा जबाब घेण्याची शक्यता आहे.
आयआयटी मुंबईतील बीटेक प्रथम वर्षाचा विद्यार्थी दर्शन सोळंकी याने गेल्या रविवारी 12 फेब्रुवारीला वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मृत दर्शन सोळंकीची बहीण जान्हवी सोळंकीने माध्यमाशी बोलताना सांगितले की, घटनेच्या दिवशी दर्शनने त्याच्या बहिणीशी आणि कुटुंबीयांशी कॅम्पसमध्ये जातीय भेदभावाबद्दल माहिती दिली होती.
बोलत असताना दर्शनने सांगितले की, त्याचे मित्र त्याच्या जातीमुळे भेदभाव करत असल्याचा दर्शनच्या बहिणीने माहिती दिली. गेल्या महिन्यात घरी आल्यावरही त्यांनी कॅम्पसमधील जातिभेदाबद्दल कुटुंबियांना सांगितले. त्याने सांगितले की जेव्हा त्याच्या मित्रांना समजले की तो अनुसूचित जातीचा आहे, तेव्हा त्यांचे त्याच्याबद्दलचे वागणे बदलले, त्यांनी बोलणे बंद केल्याचा आरोप मृत दर्शनच्या बहिणीने केला आहे.