
Mumbai crime news : केडीएमसीतील सहाय्यक सुरक्षा अधिकारी एक हजाराची लाच घेताना अटक
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी भरत बुळे याला एक हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सकाळी रंगेहाथ पकडले. खासगी सुरक्षा रक्षकाकडून बुळे याने दोन हजाराची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
दाखल तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचत बुळे याला ताब्यात घेतले आहे. केडीएमसी ला भ्रष्टाचाराने पोखरले असून स्थापनेपासून ते आत्तापर्यंत साधारण 38 जण हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत खासगी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतील होमबाबा टेकडी येथे कार्यरत असलेल्या एका खासगी सुरक्षा रक्षकाकडून भरत बुळे याने महिन्याला दोन हजार रुपयांची मागणी केली होती. पैशासाठी बुळे हा तक्रारदार यांच्याकडे वारंवार तगादा लावत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
दाखल तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने शनिवारी सकाळी सापळा रचला. यामध्ये बुळे हे अडकले आणि विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. बुळे याची चौकशी सुरु असून संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. बुळे हा आणखी एका सुरक्षा रक्षकाकडून दर महिन्याला 500 रुपये आकारत असल्याची माहिती देखील उघड होत असून याचाही तपास सुरु आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भ्रष्टाचार व खंडणीखोर अधिकाऱ्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आत्तापर्यंत तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय घरत, सुनील जोशी तसेच 4 नगरसेवक, अभियंता ते लिपिक आणि सुरक्षारक्षक असे 41 जणांवर ही कारवाई झालेली आहे.