Mumbai Crime News : मुंबई विमानतळावर 54 कोटींची हेरॉईन जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai crime police action 54 crore heroin seized Mumbai airport

Mumbai Crime News : मुंबई विमानतळावर 54 कोटींची हेरॉईन जप्त

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत दिल्लीतील एका 30 वर्षीय महिलेला 54 कोटी रुपयांच्या हेरॉईनच्या तस्करीप्रकरणी बुधवारी अटक केली.

लालरेंग पुई असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी महिला झांबिया येथून भारतात हेरॉइन आणत होती. आरोपी महिलेला अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी तीन लाख रुपये मिळणार होते. याप्रकरणी दिल्लीतील एका परदेशी महिलेचा सहभाग असून तिने या महिलेचे विमानाचे तिकीट व परदेशात राहण्याची व्यवस्था केली होती. याप्रकरणी डीआरआयचे अधिकारी परदेशी महिलेचा शोध घेत आहेत.

डीआरआयकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आफ्रिकेतील अदिस अबाबा येथून मुंबईत आलेल्या महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. तिच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यात सात किलो 600 ग्रॅम संशयीत पदार्थ सापडले. तपासणीत ते हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर बुधवारी या महिलेला अटक करण्यात आली.

आरोपी महिलेच्या चौकशीत, डिसेंबर महिन्यात दिल्लीत तिची एका परदेशी महिलेसोबत ओळख झाली होती. तिने महिलेला व्यवसायाचे आमीष दाखवले. त्यानंतर ओळख वाढवून या परदेशी महिलेने झांबियातून भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी प्रत्येक खेपेला तीन लाख रुपये देण्याचे आमीष दाखवले.

आरोपी महिलेने तस्करीसाठी होकार दिल्यानंतर परदेशी महिलेने तिचे विमानाचे तिकीट व परदेशी व्हिसा यांची व्यवस्था केली. झांबियामध्ये गेल्यानंतर तिला एक ट्रॉली बॅग देण्यात आली. ती बॅग घेऊन विमानातून उतरताना या महिलेला डीआरआयने अटक केली. या वर्षी जानेवारीमध्ये तिने झांबियातून आदिस अबाबामार्गे मुंबईत यशस्वीपणे तस्करी केली होती. या कामासाठी तिला तीन लाखांहून अधिक रुपये मिळाले असल्याचे मान्य केले.

टॅग्स :Mumbai Newspolicecrime